Thursday, 23 February 2023

प्रतिष्ठित संगीत नाटक अकादमी पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान

 



पद्मश्री दर्शना झवेरी यांचा अकादमी रत्न सदस्यता ने सन्मान

महाष्ट्रातील 12 कलावंताना पुरस्कार

 

नवी दिल्ली , 23 :   संगीत, नाटक, शास्त्रीय गायन आणि नृत्य क्षेत्रात उल्लेखणीय काम करणा-या कलावंताना प्रतिष्ठित संगीत नाटक अकादमी राष्ट्रीय पुरस्काराने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज सन्मानित करण्यात आले. यात महाराष्ट्रातील 12 कलावंताचा समावेश आहे.

            पद्मश्री दर्शना झवेरी यांना मणिपूरी या नृत्यातील विशेष योगदानासाठी   अकादमी रत्न सदस्यता या संगीत अकादमीच्या  मानाच्या पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले.

याासह राज्यातून नंदक‍िशोर कपोते यांना त्यांच्या सर्वकष योगदानासाठी गौरविण्यात आले. त्यांच्यासह लोक संगीतकार  पांडूरंग घोटकर, शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर-टिकेकर, नाटय अभिनेते प्रशांत दामले, कथक नृत्यांगना शमा भाटे, दिग्दर्शक कुमार सोहोनी, कळसूत्रीकार  मीना नाईक, सुगम संगीत गायक अनूप  जलोटा, सतारमेकर मजीद गुलाबसाहेब, ओडिसी र्नतक रबिंद्र कुमार अतिबुद्धि आणि समसामयिक र्नतक भुषण लकंद्री  यांना कला क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी आज गौरविण्यात आले.

येथील  विज्ञान भवनात आज केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्यावतीने संगीत नाटक अकादमी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रापती, केंद्रीय सांस्कृत‍िक, पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी, केंद्रीय सांस्कृतिक राज्य मंत्री अर्जुन राम मेघवाल, संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षा डॉ. संध्या पुरेचा व्यासपीठावर उपस्थित होत्या.

आजच्या पुरस्कार प्रदान सोहळयात वर्ष 2019, वर्ष 2020 आणि वर्ष 2021 असे तीन वर्षांचे पुरस्कार वितरण करण्यात आले असून एकूण 128 कलावंताना पुरस्कार प्रदान करण्यात आले. अकादमी रत्न सदस्यता पुरस्काराचे स्वरूप 3 लाख रूपये रोख आणि ताम्रपत्र असे आहे. तर साहित्य अकादमी पुरस्काराचे स्वरूप  1 लाख रूपये रोख आणि ताम्रपत्र असे आहे.

वर्ष 2019 साठी महाराष्ट्रातील दिग्दर्शन क्षेत्रात योगदान देणारे कुमार सोहोनी यांना त्यांच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखणीय कार्यासाठी आज राष्ट्रपती यांच्या पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कार प्राप्तीनंतर श्री सोहोनी यांनी दिलेल्या प्रतिक्रीयेत ते म्हणाले, दिग्दर्शनाच्या क्षेत्रात 50 या वर्ष झाली असून याच वर्षी महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक विभागाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तसेच संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार प्राप्त होने हा यथोचित सन्मान असल्याची प्रतिक्रीया त्यांनी दिली.

लोक संगीत क्षेत्रात योगदान देणारे पांडुरंग घोटकर यांना ही त्यांच्या योगदानासाठी वर्ष 2019 च्या संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले.

वर्ष  2019 साठीच सतारमेकर मजीद गुलाबसाहेब यांना वाद्य निर्मितीच्या योगदानासाठी सन्मानित करण्यात आले.

वर्ष 2020 साठीच्या पुरस्कारांमध्ये नंदकिशोर कपोते यांना कला प्रदर्शन क्षेत्रातील सर्वकष योगदानासाठी संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने राष्ट्रपती यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

हिंदुस्थानी शास्त्रीय गायनासाठी सुमधूर स्वरांची गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांना वर्ष 2020 च्या संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने राष्ट्रपती यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

सुप्रसिद्ध सिने तथा नाटय अभिनेते  प्रशांत दामले यांना नाट्य क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखणीय योगदानासाठी गौरविण्यात आले. पुरस्कार प्राप्तीनंतर दिलेल्या प्रतिक्रीयेत श्री दामले म्हणाले, मराठी नाटकात काम करण्याचा प्रचंड अभिमान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. नाटक हे टिम वर्क असून माझ्यासह निर्माते, सहकलाकार, कुंटूबाचे सदस्य, रसिक प्रेक्षक ते  महाराष्ट्रातील असो, भारतातील कुठल्याही राज्याचे असो वा संपूर्ण जगभरात पसरलेले मराठी नाटय प्रेमी यांचाही या पुरस्कारात  त‍ितकाचा वाटा आहे. आज हा मिळालेला पुरस्कार या सर्वांच्यावतीने मी घेत असल्याचे ते म्हणाले. सोबतच तरूण पिढीला आवाहन करत म्हणाले, चांगल्या कामाचा आनंद आणि पैसे दोन्ही मराठी नाटक देते.

 वर्ष 2020 साठी अभिनेत्री, दिग्दर्शिका कळसुत्रीकार  मीना नाईक  यांना कळसुत्रीच्या माध्यमातून समाज जागृती तसेच वैविध्यपूर्ण विषयांवर नाटक बसविण्याच्या उल्लेखणीय योगदानासाठी आज संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने त्यांच्या कामाचा सन्मान करण्यात आला.

सुगम संगीतातील ख्यातनाम गायक अनूप जलोटा यांना संगीत क्षेत्रातील अन्य प्रमुख पंरपरा अंतर्गत येणाऱ्या सुगम संगीतासाठी संगीत नाटक अकादमीचा मानाचा वर्ष 2020साठी पुरस्कार  प्रदान करण्यात आला.

ओड‍िसी न्यृत्य क्षेत्रातील योगदानासाठी वर्ष 2020 चा पुरस्कार मुंबईतील रबिंद्र कुमार अतिबुद्ध‍ि यांना प्रदान करण्यात आला. तसेच अहमदनगरचे भूषण लकंद्री यांना समसायिक नृत्य क्षेत्रातील योगदानासाठी संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

वर्ष 2021 साठी सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना शमा भाटे यांना नृत्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी सन्मानित करण्यात आले. 

No comments:

Post a Comment