कुमार मंगलम बिर्ला, सुमन कल्याणपूर यांना पद्म भूषण तर
4 मान्यवरांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित
नवी दिल्ली, दि. 22 : देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणा-या ‘पद्म पुरस्कारां’चे वितरण आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले. यामध्ये महाराष्ट्रातील 6 मान्यवरांना त्यांच्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी ‘पद्म पुरस्कार’ प्रदान करण्यात आले.
राष्ट्रपती भवनातील एका शानदार समारंभात पद्म पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनकड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला तसेच अन्य केंद्रीय मंत्रीगण उपस्थित होते. आज प्रथम टप्प्यात पार पडलेल्या पद्म पुरस्कार समारंभात राज्यातील 6 मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये प्रख्यात उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला आणि सुमन कल्याणपूर यांना ‘पद्मभूषण पुरस्कार’ तर श्री.भिकू रामजी इदाते, श्री राकेश राधेश्याम झुनझुनवाला (मरणोत्तर) व्यापार आणि उद्योग, श्री प्रभाकर भानुदास मांडे आणि श्री रमेश पतंगे साहित्य व शिक्षण क्षेत्रातील कामगिरीसाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कुमार मंगलम बिर्ला यांना व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. ते आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष आहेत. या समूहाला शंभर वर्षांहून अधिक जुना वारसा आहे.
प्रसिद्ध भारतीय पार्श्वगायन श्रीमती. सुमन कल्याणपूर यांना कला क्षेत्रातील पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भारतीय संगीत उद्योगातील शीर्ष 3 महिला पार्श्वगायिकांपैकी एक म्हणून ओळखल्या जातात, त्यांनी अनेक भाषांमध्ये असंख्य हिट गाणे दिले आहेत.
4 मान्यवरांना आज पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला
श्री राकेश राधेश्याम झुनझुनवाला (मरणोत्तर) यांना व्यवसाय आणि उद्योग शेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार श्रीमती रेखा झुनझुनवाला यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते स्वीकारला.
श्री भिकू रामजी इदाते हे ‘दादा इदाते’ या नावाने प्रसिद्ध असलेले एक महान विचारवंत, वक्ते, लेखक, नेते आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. जे डीएनटी समुदायांच्या उत्थानासाठी आणि सामाजिक-आर्थिकदृष्ट्या शोषित लोकांच्या विकासासाठी उल्लेखनीय योगदानासाठी ओळखले जातात.
डॉ प्रभाकर भानुदास मांडे हे लोककथा, लोक संस्कृती आणि साहित्यातील आघाडीचे विद्वान समजले जातात. डॉ मांडे यांना अनेक राज्य आणि राष्ट्रीय चर्चासत्रांचे आयोजन केले आहे. त्यांच्या ‘गावगाड्या बाहेर’ आणि ‘सांकेतिक गुप्त भाषा: परमार आणि स्वरूप’ या पुस्तकांसाठी त्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने 1991 मध्ये डी. लिट. देऊन सन्मान केला आहे.
श्री रमेश रघुनाथ पतंगे हे नामवंत लेखक, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. ते मुंबईतील हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्याशिवाय, सामाजिक समरसता मंच, भटके विमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद आणि समरसता अध्ययन केंद्र आणि विवेक व्यासपीठ अशा संस्थांचेही ते सहसंस्थापक आहेत. त्यांनी सामाजिक समता आणि देशभक्तीचा प्रचार करणारी 52 पुस्तके लिहिली आणि प्रकाशित केली आहेत.
राष्ट्रपती यांनी राष्ट्रपती भवन येथे आयोजित नागरी पुरस्कार समारंभ-I मध्ये 2 पद्मविभूषण, 4 पद्मभूषण आणि 2023 साठी 47 पद्मश्री पुरस्कार प्रदान केले.
00000
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
No comments:
Post a Comment