Thursday 20 April 2023

अपघातमुक्त सेवा देणाऱ्या महाराष्ट्रातील 6 बस चालकांचा ‘सुरक्षा पुरस्कारा’ने सन्मान

 

 

नवी दिल्ली, 19 : सार्वजनिक वाहतूक सेवेमध्ये अपघातमुक्त बस चालविणाऱ्या महाराष्ट्रातील 6 बस चालकांचा सुरक्षा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. देशभरातील एकूण 42  बस चालकांना यावेळी सन्मानित करण्यात आले.  यामध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळातील 2 ,नवी मुंबई महानगर पालिका परिवहनाचे 1,  सोलापूर महानगर पालिका महामंडळाचे 1,  पुणे महानगर पालिका परिवहन महामंडळ मर्यादितचे 1, बेस्ट चे 1 वाहन चालकांचा समावेश आहे.

            येथील कंस्टीट्यूशन क्लबमध्ये मंगळवारी सायंकाळी  असोसिएशन ऑफ स्टेट रोड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग्ज (एएसआरटीयू) च्यावतीने ‘हिरोज ऑन द रोड’या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या सचिव अलका उपाध्याय यांच्या हस्ते अपघात मुक्त, निर्दोष सेवेबद्दल कृतज्ञता म्हणून बस चालकांच्या कुटूंबीयांसोबत सुरक्षा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामध्ये 17 बस चालकांनी त्यांच्या एकूण सेवेत अपघात न करता 30 वर्षे सेवा दिलेली आहे.

या पुरस्कार विजेत्यांमध्‍ये महाराष्‍ट्रातील एकूण सहा बस  चालकांचा समावेश आहे. महाराष्‍ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या दोन चालकांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये किसन रामभाऊ घोडके (36 वर्ष अपघातमुक्त सेवा ) आणि मुल्ला मोहम्मद रफिक अब्दूल सत्तार (29 वर्ष अपघातमुक्त सेवा ) अशी या गुणवंत चालकांची नावे आहेत. तसेच नवी मुंबई महानगरपालिका वाहतूक सेवेतील नंदकुमार लवांड (26 वर्ष अपघातमुक्त सेवा) सोलापूर महानगरपालिका वाहतूक सेवेतील राजेंद्र महादेव आवटे (25 वर्ष अपघातमुक्त सेवा ), पुणे म‍हानगर परिवहन महामंडळातील करूण नारायण कुचेकर (24 वर्ष अपघातमुक्त सेवा ), बेस्ट सेवेतील गिरीजाशंकर लालताप्रसाद पांडे (21 वर्ष अपघातमुक्त सेवा ) यांचा  गौरव करण्‍यात आला.

सध्या, महानगरपालिका अंतर्गत 80 राज्य मार्ग परिवहन उपक्रम  हे एएसआरटीयू चे सदस्य आहेत. जे संयुक्तपणे अंदाजे 1,50,000 बस चालवतात आणि सुमारे 70 दशलक्ष प्रवाशांना परवडणारी आणि सुरक्षित वाहतूक सेवा  प्रदान करतात. एएसआरटीयूच्यावतीने प्रामुख्‍याने सार्वजनिक रस्ते वाहतुकीला प्रोत्साहन देण्‍यासाठी सुधारणा घडवून आणत आहेत. तसेच  नवनवीन  घडामोडींवर चर्चा करण्यासाठी, वाहतूकविषयक प्रमुख समस्या/आव्हाने ओळखण्यासाठी विविध बैठका, परिषदा आणि परिसंवाद/कार्यशाळा यांचे आयोजन करत आहे.  राज्य रस्ते वाहतूक उपक्रमांच्या सर्वोत्तम पद्धतींबद्दल माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी एक मंच म्हणून एएसआरटीयू  कार्यरत आहे. 

रस्ते अपघात कमी करण्यासाठी एसआरटीयूने केलेल्या काही उपाययोजना  चालकांसाठी जाहीर केल्या आहेत.  यामध्ये  भर्तीच्या टप्प्यातच सुशिक्षित आणि अनुभवी चालकाची निवड करणे. निवडलेल्या चालकांना भर्तीच्या वेळीच अद्यावत प्रशिक्षण देणे. वेळोवेळी प्रोत्साहन देण्‍यासाठी वाहनचालकांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव  करणे.

---२---

 

 

---२--

 वाहना संदर्भात काही सूचना जाहीर केल्या आहेत. यामध्ये वेळापत्रकानुसार बसची देखभाल करणे तसेच ब्रेक, स्टीयरिंग, हेडलाइट्स, टायर इत्यादी सुरक्षेशी संबंधित तांत्रिक बाबींवर लक्ष केंद्रित करणे. चालकाच्या आसनाचे ‘अर्गोनॉमिक डिझाइन’ असने,  नेहमी वाहनाच्या दुरूस्तीची खात्री करणे.   कार्याचे वेळापत्रक आधी जाहीर करने,  चालकांना योग्य विश्रांतीच्या अंतरासह रोस्टर पद्धतीने काम करवून घेणे. सर्व सुविधांसह कर्मचाऱ्यांसाठी   प्रसाधनगृहांची व्यवस्था असने,  प्रोत्साहनपर   उपाय योजना आखणे,  वर्षातून किमान एकदा सर्व चालकांसाठी अद्यावत  प्रशिक्षण कार्यक्रम सुनिश्चित करणे.  डेपो, प्रदेश, विभाग आणि राज्य स्तरावर अपघातमुक्त सेवा चालकांना रोख पुरस्कार आणि प्रमाणपत्र देण्याचे उपक्रम  राबविणे.

No comments:

Post a Comment