Tuesday, 30 January 2024
शिवरायांचा आठवावा प्रताप ! मराठ्यांच्या 12 किल्ल्यांची नावे युनेस्कोच्या मान्यतेसाठी "मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया" 2024-25 या वर्षासाठी युनेस्कोच्या जागतिक वारसासाठी भारताकडून नामांकन
नवी दिल्ली, 30: महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील मराठा लष्करी रणभूमीचा परिसर अर्थात गडकिल्ल्यांना जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठीचा प्रस्ताव भारत सरकारने युनेस्कोला सादर केला आहे.
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत (UNESCO World Heritage List) समावेश होण्यासाठी प्रत्येक देश नामांकने पाठवत असतो. यंदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळावा यासाठी युनेस्कोला वर्ष 2024-25 करिता केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने मराठा रणभूमीला नामांकन देण्याचे प्रस्ताव पाठविले आहे. यामध्ये किल्ले रायगड, राजगड, शिवनेरी, तोरणा, लोहगड, साल्हेर, खंडेरी, प्रतापगड, पन्हाळा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग किल्ल्यांचा समावेश आहे. हे किल्ले सतराव्या ते एकोणिसाव्या शतकात बांधले गेलेले आहेत. हे किल्ले मराठा सैन्याच्या विलक्षण तटबंदीचा आणि असामान्य लष्करी व्यवस्थेचा प्रमाण आजही देतात.
2024-25 या वर्षासाठी युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत मान्यता मिळण्यासाठी भारताचे “मराठा मिलिटरी लँडस्केप्स” हे नामांकन आहे. नामांकन दोन श्रेणींमध्ये करता येऊ शकते - सांस्कृतिक आणि नैसर्गिक निकष. मराठा लष्करी भूदृश्ये सांस्कृतिक निकषांच्या श्रेणीमध्ये नामांकित आहे.
भारतात सध्या 42 जागतिक वारसा स्थळे आहेत, त्यापैकी 34 सांस्कृतिक स्थळे, सात नैसर्गिक स्थळे तर एक मिश्र स्थळ आहे. यापैकी, महाराष्ट्रात सहा जागतिक वारसा स्थळे आहेत, पाच सांस्कृतिक आणि एक नैसर्गिक स्थळ आहे. अजिंठा लेणी (1983), एलोरा लेणी (1983), एलिफंटा लेणी (1987), छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (पूर्वीचे व्हिक्टोरिया टर्मिनस) (2004), व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको एन्सेम्बल्स ऑफ मुंबई (2018) आणि महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळचा पश्चिम घाट ही नैसर्गिक श्रेणी (2012) मध्ये अनुक्रमिक मालमत्ता आहे.
**************
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic
अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.27 / दिनांक 30.1.2024
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment