Monday 26 February 2024

भारतातील वस्त्रोद्योगाचे भविष्य उद्धृत करणाऱ्या भारत टेक्स 2024 जागतिक वस्त्रोद्योग महोत्सवाचे थाटात आयोजन





नवी दिल्‍ली, 26: भारत टेक्स 2024 या जगातील आतापर्यंतच्या सर्वात भव्य अशा वस्त्रोद्योग महोत्सवाची उद्घाटन, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. हे महोत्सव देशातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या जागतिक वस्त्रोद्योग महोत्सवांपैकी एक असून, यात महाराष्ट्र राज्य सहभागी झाला आहे.

राजधानीतस्थित प्रगती मैदानातील भारत मंडपम येथे आज पासून सुरू झालेल्या या चार दिवसीय महोत्सवाचे आयोजन, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय कडून करण्यात आले आहे. या प्रदर्शनीमध्ये सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सहभागी झाले आहेत.

महोत्सवात सहभागी, महाराष्ट्राच्या दालनाचे उद्घाटन वस्त्रोद्योग विभागाचे सचिव, विरेंद्र सिंग यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्यातील खादी व ग्रामोद्योग बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, श्रीमती आर. विमला, महाराष्ट्र उद्योग विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी, अजय भंडारी व महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या सह व्यवस्थापकीय संचालक, श्रीमती फरोग मुकादम उपस्थित होते.

महाराष्ट्र दालनात एकूण 28 स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. यामध्ये वीरमाता जीजाबाई टेक्‍नोलॉजी इन्स्टिटयूट, इन्स्टिटयूट  ऑफ केमिकल टेक्‍नोलॉजी, खादी ग्रामउद्योग मंडळ, डिकेटिई सोसायटीचे टेक्सटाईल इंजिनिअरिंग इन्स्टिटयूट, महाराष्ट्र उद्योग विकास महामंडळ, महाराष्ट्र पर्यंटन विकास महामंडळ या दालनांचा समावेश आहे.  यात राज्याची पारंपारिक पैठणी, खण, हिमरू, घोंगडी, सोलापूर चादर, पुणेरी पगडी,  टस्सर रेशीम, मलबेरी रेशीम, हातमाग साड्या, टोप्या, टेरी टॉवेल, कोल्हापूरी चप्पल, पैठणीच्या बॅग यासह माविम कडूनही स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. आयोजकांनी हा महोत्सव लक्षवेधक आणि अभ्यागतांसाठी आकर्षक ठरेल, अशी सजावट केली आहे.

भारताचे जागतिक सामर्थ्य, त्याचे शाश्वत उपक्रम तसेच मूल्य साखळीतील सामर्थ्य अधोरेखित करण्यासाठी एक माध्यम म्हणून या महोत्सवाचे उद्दिष्ट आहे.  यामध्ये सुमारे 40 देशांमधले प्रदर्शक आणि ग्राहक सहभाग नोंदवले आहे. भारत टेक्स 2024 संपूर्ण वस्त्रोद्योग क्षेत्रातील मूल्य साखळीचे व्यापक दर्शन घडवेल, भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि वस्त्रोद्योग परंपरांपासून ते अगदी अलीकडील तांत्रिक नवनिर्मितीचे प्रतिबिंब या महोत्सवातून दिसून आला. यामध्ये 40 देशांतील 1,000 हून अधिक प्रदर्शक आणि 30,000 पेक्षा अधिक कारीगीर व उद्योजक सहभागी झाले आहेत.

या मेगा इव्हेंटमध्ये ज्ञानाधारित सत्रे, परिसंवाद आणि संमेलने, सीईओ गोलमेज परिषद, बी टू बी  आणि जी टू जी बैठक, धोरणात्मक गुंतवणूक घोषणा, उत्पादन शुभारंभ सोहळा आणि जागतिक स्तरावर कापड उद्योगाला पुन्हा एकदा परिभाषित करणाऱ्या उपक्रमांचा समावेश असेल. चार दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात 65 हून अधिक ज्ञान सत्रे असतील ज्यात 100 पेक्षा जास्त जागतिक पॅनेल या क्षेत्राशी संबंधित विविध समस्यांवर चर्चा करतील. यामध्ये टिकाऊपणा आणि पूनर्वापरासाठी यावर समर्पित मंडप, एक 'इंडी हाट', भारतीय कापड वारसा, टिकाऊपणा आणि जागतिक डिझाईन्स यांसारख्या विविध थीमवर फॅशन सादरीकरणे तसेच परस्पर फॅब्रिक चाचणी झोन आणि उत्पादनांची प्रात्यक्षिके देखील असतील. यासोबतच, आंतरराष्ट्रीय भागीदारीसह 46 सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात येणार असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. तर, या इव्हेंटमध्ये फायबर, फॅब्रिक आणि फॅशन फोकसच्या माध्यमातून परदेशी आणि संपूर्ण टेक्सटाइल व्हॅल्यू चेनचा समावेश असेल. आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत या पंतप्रधानांच्या व्हिजनला पुढे नेण्यासाठी हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल ठरेल.

******************

 

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.38 / दिनांक 26.02.2024

 

 

 

 

No comments:

Post a Comment