Wednesday, 14 August 2024

निवासी आयुक्त यांच्या हस्ते अधिकारी-कर्मचाऱ्यांना राष्ट्रध्वज वितरण ‘घरोघरी तिरंगा’ अभियानाची










 

नवी दिल्ली, 14: प्रधान सचिव तथा महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त रूपिंदर सिंग यांच्या हस्ते महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना आज राष्ट्रध्वज वितरीत करून ‘घरोघरी तिरंगा’ अभियान राबविण्यात आले.

स्वातंत्र्याच्या महोत्सवानिमित्त  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नऊ ऑगस्ट रोजी ऑगस्ट क्रांती मैदान, मुंबई पासून देशभरात राबविण्यात येणारा ‘हर घर तिरंगा’ (घरो घरी तिरंगा) अभियानास प्रारंभ केला. राज्य शासनाच्यावतीने ‘घरो घरी तिरंगा अभियाना’ ची सुरुवात झाली असून, या अभियानातंर्गत आज कॉपरनिकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनात निवासी आयुक्तांच्या हस्ते राष्ट्रध्वज वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदनाच्या परिसरात निवासास असणाऱ्या अधिकारी - कर्मचाऱ्यांच्या घरोघरी जावून यावेळी निवासी आयुक्तांनी राष्ट्रध्वज वितरित केले व हे ध्वज आप-आपल्या घरावर लावण्याचे आवाहन यावेळी केले. या आवाहनाला प्रतिसाद देत सदनातील घराघरांवर राष्ट्रध्वज डौलाने फडकले. यावेळी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ‘घरोघरी तिरंगा’, ‘वंदे मातरम’, ‘भारत माता की जय’ असे नारे दिले व वातावरण देशभक्तीमय झाले.

निवासी आयुक्त रूपिंदर सिंग यांनी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार व श्रीमती स्मिता शेलार, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या उपसंचालक अमरज्योतकौर अरोरा यांच्यासह उपस्थित महाराष्ट्र सदनातील अधिकारी -कर्मचाऱ्यांना राष्ट्रध्वज वितरित केले.

महाराष्ट्र परिचय केंद्रातही राष्ट्रध्वजाचे वितरण

घरोघरी तिरंगा अभियान’अंतर्गत महाराष्ट्र परिचय केंद्रातही उपसंचालक अमरज्योतकौर अरोरा यांच्या हस्ते कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना राष्ट्रध्वजाचे वितरण करण्यात आले.

**********

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic  

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र. 95दिनांक 14.08.2024

 


 

No comments:

Post a Comment