राष्ट्रपतीच्या हस्ते 50 शिक्षकांना विशेष योगदानाबद्दल राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार
नवी दिल्ली, 31: शालेय, उच्च, आणि कौशल्य शिक्षणाच्या क्षेत्रात माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2024 साठी निवडलेल्या 50 शिक्षकांमध्ये महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील जाजावंडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक मंतैय्या बेडके आणि कोल्हापूरच्या एस.एम. लोहिया हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधील चित्रकला शिक्षक सागर बागडे यांचा समावेश आहे.
:: मंतैय्या बेडके विषयी ::
श्री. मंतैय्या बेडके यांनी गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त आणि दुर्गम भागात उत्कृष्ट कार्य करत शाळेची पटसंख्या 8 वरून 138 पर्यंत वाढवली आहे. त्यांनी लोकसहभागातून शाळेत स्मार्ट टीव्ही आणि इन्व्हर्टरसारख्या सुविधा उभारल्या आहेत. त्यांच्या अथक मेहनतीने आणि समर्पणाने गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आदर्श निर्माण केला आहे.:: सागर बागडे विषयी ::
श्री. सागर बागडे गेल्या 30 वर्षांपासून कोल्हापूरच्या एस.एम. लोहिया हायस्कूलमध्ये चित्रकला शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना त्यांना मिळालेला हा राष्ट्रीय पुरस्कार त्यांच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाचा गौरव आहे. त्यांनी विद्यार्थ्यांसोबत देश-विदेशात कार्यक्रम करून दोन विश्वविक्रमही नोंदवले आहेत.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या शिक्षकांना 5 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित समारंभात पुरस्कार प्रदान करतील. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारात प्रशस्ती पत्र, रु.50,000 रोख बक्षीस रक्कम आणि एक रौप्यपदक समाविष्ट आहे.
*****************
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic
अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र. 109/ दिनांक 31.08.2024
No comments:
Post a Comment