Wednesday, 20 August 2025

सोलापूर आणि सातारा जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्यासाठी मंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्ली मध्ये घेतल्या विविध केंद्रीय मंत्र्यांच्या महत्त्वपूर्ण भेटी









नवी दिल्ली, दि. 20: महाराष्ट्राचे पंचायत राज व ग्रामविकास मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री  जयकुमार गोरे  हे आज दिल्ली दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी सोलापूर आणि सातारा जिल्ह्याच्या महत्त्वपूर्ण विषयासंदर्भात  विविध केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन चर्चा केली. 

 

मंत्री श्री गोरे यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक आणि  मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन जिल्ह्यातील पालखी मार्गामधील  अडथळे दूर करावेत तसेच फलटण ते पुणे  हा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करावा अशी विनंती केली.

 

जिहे-कठापूर लिफ्ट सिंचन योजनेसाठी केंद्रीय पाणी आयोगाशी चर्चा

 

सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, कोरेगाव आणि सातारा तालुक्यांतील दुष्काळग्रस्त गावांना सिंचन सुविधा पुरवण्यासाठी गोरे यांनी गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर लिफ्ट सिंचन योजनेच्या टप्पा-दोनच्या विस्ताराला गती देण्याच्या उद्देशाने केंद्रीय पाणी आयोगाचे अध्यक्ष अतुल जैन यांची सेवा भवन येथे भेट घेतली. या वेळी त्यांनी तांत्रिक सल्लागार समिती (TAC) मंजुरीसाठी औपचारिक निवेदन सादर केले. ही योजना 176 गावांना लाभ देणारी असून, 6.332 टीएमसी पाण्याचा वापर करून 60,437 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळेल. यामुळे शेतकऱ्यांचे सामाजिक-आर्थिक जीवनमान सुधारेल आणि स्थलांतर कमी होण्यास मदत होईल. या प्रकल्पाला 1997 मध्ये प्रथम प्रशासकीय मान्यता मिळाली होती, परंतु निधीच्या कमतरतेमुळे कामे थांबली होती. 2019 मध्ये दुसरी पुनरीक्षित प्रशासकीय मान्यता (₹1,33,074 कोटी) मिळाली, तर 2022 मध्ये प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजनेत (PMKSY) समावेश करताना ₹647.69 कोटी मंजूर झाले. या निधीमुळे जिहे-कठापूर बॅरेज, मुख्य पंप हाऊस, वर्धनगड आणि आंधळी बोगद्यांची कामे पूर्ण झाली असून, सध्या 14,600 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळत आहे. नीर लिफ्ट सिंचन योजना क्रमांक 1 आणि 2 तसेच आंधळी लिफ्ट सिंचन योजनेची कामे सध्या प्रगतीपथावर असून, ती मार्च 2026 पर्यंत पूर्ण होण्याचे नियोजन आहे. 11 ऑक्टोबर 2024 च्या ठरावानुसार प्रकल्पाला तिसरी पुनरीक्षित प्रशासकीय मान्यता मिळाली असून, टप्पा-दोनसह एकूण खर्च ₹5,409.72 कोटी आहे. हा प्रकल्प मार्च 2029 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. गोरे यांनी TAC मंजुरीसाठी तातडीने कार्यवाही करण्याची विनंती केली. “या योजनेमुळे सातारा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल,” असे विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

 

ग्रामीण रस्ते विकासासाठी शिवराज सिंह चौहान यांच्याशी भेट

 

या दौऱ्या दरम्यान मंत्री गोरे यांनी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेऊन प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (PMGSY) टप्पा-4 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी निवेदन सादर केले. यापूर्वी 17 एप्रिल 2024 रोजीही त्यांनी चौहान यांच्याशी याच विषयावर चर्चा केली होती. या निवेदनात महाराष्ट्रातील ग्रामीण रस्ते विकासाला गती देण्यासाठी महत्त्वाच्या सूचना मांडण्यात आल्या. PMGSY टप्पा-3 अंतर्गत महाराष्ट्रासाठी 2,009 रस्त्यांना मंजूरी मिळाली असून, त्यांची एकूण लांबी 6,455 किलोमीटर आहे. टप्पा-4 अंतर्गत सामान्य क्षेत्रातील 500 पेक्षा जास्त आणि दुर्गम क्षेत्रातील 250 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांना बारमाही रस्त्यांनी जोडण्याचे उद्दिष्ट आहे. सध्याचे पात्रता निकष 2011 च्या जनगणनेवर आधारित असून, गेल्या 12 वर्षांत लोकसंख्येत झालेली वाढ लक्षात घेता, गोरे यांनी जल जीवन मिशनप्रमाणे वर्तमान लोकसंख्येवर आधारित निकष लागू करण्याची मागणी केली. याशिवाय, 250 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्वसाधारण वसाहतींना पात्र ठरविण्याची आणि टप्पा-1 अंतर्गत बांधलेले 10,000 किलोमीटर रस्ते, जे जड वाहतुकीमुळे खराब झाले आहेत, त्यांच्या दुरुस्ती व उन्नयनासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती त्यांनी केली. “ग्रामीण रस्ते हे विकासाचा पाया आहे. केंद्र सरकारच्या सहकार्याने या सूचना अमलात आल्यास महाराष्ट्रातील ग्रामीण भागाचा कायापालट होईल,” असे गोरे यांनी सांगितले. चौहान यांनी या सूचनांवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले.

 

यासह केंद्रीय राज्य विमानन मंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली. सोलापूर येथून मुंबई ते पुणे विमान सेवा सुरळीत व्हावी, यासंदर्भात चर्चा केली. तसेच 10 ऑक्टोंबर 20 24 राज्य शासनाच्या शासन निर्णयाप्रमाणे राज्य शासन प्रवाशांना सुविधा देणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्र्यांना दिली.

 

0000

महाराष्ट्र परिचय केंद्रनवी दिल्ली - वृत्त विशेष -183

एक्स वर आम्हाला फॉलो करा:                                                                                        

https://x.com/MahaGovtMic /https://x.com/micnewdelhi /https://x.com/MahaMicHindi


 

Friday, 8 August 2025

शेतकऱ्यांचे हित आणि एपीएमसी आधुनिकीकरणासाठी केंद्र-राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक घ्यावी - मंत्री जयकुमार रावल यांची केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे मागणी



नवी दिल्ली, 8:- शेती उत्पादन व्यवस्थापन, शेतकऱ्यांना योग्य मोबदला, साठवणूक सुविधांचे आधुनिकीकरण आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या (एपीएमसी) पायाभूत सुविधा विकासासाठी केंद्र-राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक तातडीने बोलावण्याची मागणी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या कडे केली.

तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक हित आणि कृषी कार्यक्षमता वाढवण्यासाठी ठोस उपाययोजना सुचवत मंत्री रावल यांनी केंद्रीय योजना तयार करण्याची विनंतीही यावेळी केली.  गेल्या तीन दिवसापासून मंत्री रावल दिल्ली दौऱ्यावर होते, दरम्यान त्यांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांची  भेट घेतली.

 

मंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी नमूद केले की, महाराष्ट्रासह देशभरात कांदा, डाळी, संत्री, डाळिंब, केळी आणि फुले यांसारख्या शेती उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र, अपुऱ्या बाजार यंत्रणा आणि वैज्ञानिक साठवणूक सुविधांच्या अभावामुळे शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नाही. शेतमाल काढणी पश्चात अपुऱ्या साधनांमुळे काही प्रमाणात नुकसान होते. याचा शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर आणि देशाच्या कृषी कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होतो.

 

श्री रावल यांनी शेतमालाला योग्य किंमत मिळवून देण्यासाठी विशेष समर्थन योजना, विकेंद्रित वैज्ञानिक साठवणूक सुविधा, थंड साखळी, डिजिटल सूची व्यवस्थापन आणि कार्यक्षम रसद प्रणाली विकसित करण्याचा प्रस्ताव मांडला. बाजार माहिती प्रणालीच्या एकत्रीकरणाद्वारे उत्पादन आणि किंमतीच्या ट्रेंडचा अचूक अंदाज घेऊन शेतकऱ्यांना वेळेवर माहिती पुरवण्यावरही त्यांनी भर दिला. यामुळे धोरणकर्त्यांना माहितीवर आधारित निर्णय घेता येतील.

 

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आधुनिकीकरणासाठी मंत्री रावल यांनी केंद्रीय योजना तयार करण्याची मागणी केली, ज्यामध्ये झाकलेली लिलाव व्यासपीठे, ग्रेडिंग-तोलन व्यवस्था, थंड साठवण, कोरडे कोठार, पॅकेजिंग केंद्रे आणि कचरा व्यवस्थापन सुविधांचा समावेश आहे. एपीएमसी परिसरातील न वापरलेल्या जागेत लहान अ‍ॅग्रो-प्रोसेसिंग युनिट्स, शेतकरी-केंद्रित सुविधा उभारण्यासाठी प्रोत्साहन आणि तांत्रिक सहाय्य देण्याची विनंतीही त्यांनी केली. तसेच, ई-नाम सारख्या डिजिटल व्यासपीठांशी एपीएमसीला जोडण्यासाठी अनुदान आणि क्षमता बांधणीवर जोर देण्यात यावा असे सांगितले.

 

या बैठकीतून ठोस रोडमॅप तयार करून शेतकऱ्यांचे हित जोपासले जाऊ शकते, असे रावल यांनी सांगितले. अशा उपायांमुळे शेती व्यवसाय टिकाऊ होईल आणि भारताची आंतरराष्ट्रीय शेती बाजारातील नेतृत्व भूमिका अधिक मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 

0000

महाराष्ट्र परिचय केंद्रनवी दिल्ली - वृत्त विशेष - 171

एक्स वर आम्हाला फॉलो करा:

https://x.com/MahaGovtMic /https://x.com/micnewdelhi /https://x.com/MahaMicHindi


 

Sunday, 3 August 2025

राजधानीत क्रांतिसिंह नाना पाटील जयंती साजरी





नवी दिल्ली, 03 : स्वातंत्र्यसंग्रामातील महान सेनानी, ‘परदेशी नव्हे, स्वराज्य हवे’ या विचारांचा पुरस्कार करणारे क्रांतिकारक क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सदनाचे व्यवस्थापक प्रमोद कोलपते यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

 

कोपर्निकस मार्ग येथील महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात वरिष्ठ सहायक कक्ष अधिकारी सारिका शेलार यांच्यासह  उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

 

व्यवस्थापक प्रमोद कोलपते यांनी नाना पाटील यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील कार्याचा आणि सातारा  प्रजासत्ताक स्थापन करण्यातील त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा परिचय उपस्थितांना करून दिला.

 

या कार्यक्रमास महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्र येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

  

000000000000

 

महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली  वृत्त विशेष 163

एक्स वर आम्हाला फॉलो करा:

https://x.com/MahaGovtMic /https://x.com/micnewdelhi /https://x.com/MahaMicHindi


 

Friday, 1 August 2025

71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा श्यामची आई चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार






नवी दिल्ली : केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2023 ची घोषणा केली. यामध्ये सुजय डहाके दिग्दर्शित श्यामची आई चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार जाहीर झाला आहे. तर, आशिष भेंडे दिग्दर्शित मराठी चित्रपट आत्मपॅम्फलेट तसेच नाळ 2 चित्रपटाला स्वर्ण कमल पुरस्कार घोषित झाला आहे.

सर्वोत्कृष्ट बाल कलाकार पुरस्कार जिप्सी या चित्रपटातील बाल कलाकार कबीर खंडारे तर त्रिशा ठोसर, श्रीनिवास पोखले आणि भार्गव जगताप यांना संयुक्तपणे नाळ 2 चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला आहे.

यावेळी ४० फीचर चित्रपट पुरस्कार, १५ नॉन-फीचर पुरस्कार आणि १ चित्रपटांवरील सर्वोत्कृष्ट लेखन पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. फीचर चित्रपट पुरस्कार निवडीच्या ज्युरीचे नेतृत्व आशुतोष गोवारीकर, नॉन-फीचर ज्युरीचे नेतृत्व पी. शेषाद्री आणि चित्रपटांवरील सर्वोत्कृष्ट लेखन ज्युरीचे नेतृत्व गोपाळकृष्ण पै यांनी केले. २०२३ वर्षामधील राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार फीचर, नॉन फीचर आणि चित्रपटांवरील सर्वोत्कृष्ट लेखन अशा तीन विभागांमध्ये जाहीर करण्यात आले. हे पुरस्कार लवकरच प्रदान केले जाणार आहेत.

सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्री पुरस्कार 

हिंदी चित्रपट ’१२ वी फेल’ला सर्वोत्कृष्ट फीचर चित्रपट पुरस्कार जाहीर झाला. जवान चित्रपटासाठी शाहरुख खान आणि ’१२ वी फेल’साठी विक्रांत मेस्सी यांना संयुक्तपणे ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ पुरस्कार जाहीर झाला. राणी मुखर्जीला ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार’ जाहीर करण्यात आला.

‘आत्मपॅम्फलेट’साठी आशिष बेंडे यांना पुरस्कार

दिग्दर्शकाचा सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट पुरस्कार मराठी दिग्दर्शक आशिष बेंडे यांना जाहीर झाला आहे. आत्मपॅम्फलेट या चित्रपटासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. 

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपट

सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - कटहल- अ जॅकफ्रुट मिसरी, सर्वोत्कृष्ट अभिनेता- शाहरुख खान आणि विक्रांत मेस्सी, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- राणी मुखर्जी, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – सुदिप्तो सेन, द केरला स्टोरी, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – उर्वशी, उलोझुक्कु, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – विजयराघवन आणि मुथुपेट्टई सोमू भास्कर, राष्ट्रीय, सामाजिक आणि पर्यावरणीय मूल्यांना प्रोत्साहन देणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट - सॅम बहादुर पुरस्कार घोषित करण्यात आला.

000000000000

 

महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली  वृत्त विशेष - 162

एक्स वर आम्हाला फॉलो करा:

https://x.com/MahaGovtMic /https://x.com/micnewdelhi /https://x.com/MahaMicHindi

  

 

पंतप्रधानांचे नागरिकांना आगामी स्वातंत्र्यदिनाच्या संदर्भात संकल्पना पाठविण्याचे आवाहन

नवी दिल्ली दि. 1 - भारत देश यंदा 79 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची तयारी करत आहे.या पार्श्वभूमीवर पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज सर्व नागरिकांना 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून होणाऱ्या भाषणाच्या संदर्भात त्यांचे विचार आणि संकल्पना मांडण्यासाठी आमंत्रित केले आहे. 

 “आपल्या एक्स पोस्टवर केलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले, या वर्षीच्या जवळ येत असलेल्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने, मी माझ्या भारतीयांच्या संकल्पना जाणून घेण्यास उत्सुक आहे! या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात आपणास कोणते विषय किंवा संकल्पना प्रतिबिंबित झालेल्या ऐकायला आवडतील?” यासाठी नागरिकांनी MyGov आणि NaMo App वरील खुल्या मंचावर आपले विचार व्यक्त करावेत असे आवाहन केले आहे. अधिक माहिती साठी https://www.mygov.in/group-issue/let-your-ideas-and-suggestions-be-part-pm-modis-independence-day-speech-2025/ या संकेत स्थळाला अवश्य भेट द्या. 

                                                                    000000000000 

 महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली – वृत्त विशेष - 161 
 एक्स वर आम्हाला फॉलो करा: 
 https://x.com/MahaGovtMic /https://x.com/micnewdelhi /https://x.com/MahaMicHindi