नवी दिल्ली, 1 मे : महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या वर्धापनदिनानिमित्त राजधानी दिल्लीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गणेशवंदना, आषाढी वारी, गोंधळ, धनगर नृत्य, भारूड, पोवाडा, अभंग, दिवली, कोळी नृत्यासह ‘महाराष्ट्र गीत’ अशा विविध समृध्द कलाकृतींचे दमदार सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडले.
दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्ग स्थित नवीन महाराष्ट्र सदनाच्या बँक्वेट हॉलमध्ये आज महाराष्ट्र दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त आर. विमला यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या. दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी श्री. संजीव कुमार, श्री. राजेश अग्रवाल, श्रीमती सुमन चंद्रा यांच्यासह महाराष्ट्र सदनाचे सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, स्मिता शेलार, सारिका शेलार, परिचय केंद्राच्या उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा, माहिती अधिकारी अंजु निमसरकर, महाराष्ट्र सदनचे व्यवस्थापक आणि अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याच्या वर्धापन दिनानिमित्ताने आज राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदनानेही यानिमित्त राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक, ऐतिहासिक वारश्याचे दर्शन घडविणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि महाराष्ट्र सदन यांच्या संयुक्त विद्यमाने अमये पाटील यांच्या ‘भैरी भवानी परफॉर्मिंग आर्ट्स” संस्थेच्या कलाकारांनी 'गर्जा महाराष्ट्र माझा' कार्यक्रम सादर केला.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक वारश्याचे दर्शन
श्री गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर जिजाऊ वंदना, छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक गीत, महाराणी ताराराणी, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर वंदना गीत, आषाढी वारी, सादरीकरण झाले. रांगड्या आवाजात डफाच्या तालावर शिवाजी महाराजांच्या पोवाडयाने मनाचा ठेका धरला. आई अंबाबाईचे जागरण, गोंधळ सादरीकरणाने संपूर्ण वातावरण भारावले. या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या समृध्द लोक संस्कृतीचे प्रतिबिंब उभे केले, कार्यक्रमाला उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
००००००००००००
अंजू निमसरक,मा.अ./वि.वृ.क्र.98 /दि.01.05.2025