Monday, 23 November 2015

महाराष्ट्राच्या समृध्द सांस्कृतिक वारशाचे बहारदार सादरीकरण ; आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात ‘महाराष्ट्र दिन’ साजरा



नवी दिल्ली, 23 :  महाराष्ट्र दिन कार्यक्रमातील हिंदी पोवाडा, लावणी, जोगवा, गण-गौळण, वाघ्या-मुरळी, दिंडी, अभंग, वासुदेव आदी लोक कलांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समृध्द सांस्कृतिक वारशाच्या बहारदार सादरीकरणाने सोमवारी प्रगती मैदान येथे देश-विदेशातील प्रेक्षकांची मन जिंकली.
भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा 2015 ला 14 नोव्हेंबर पासून सुरुवात झाली. या मेळाव्यात दररोज सायंकाळी लालचौक खुला रंगमंच येथे व्यापार मेळाव्यात सहभागी राज्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होत असते. व्यापार मेळाव्याच्या दहाव्या दिवशी आज  ‘महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.
 या कार्यक्रमाचे उदघाटन  निवासी आयुक्त तथा सचिव आभा शुक्ला यांच्या हस्ते झाले. अपर निवासी आयुक्त समीर सहाय, महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक आर. डी. मडके यावेळी उपस्थित होते.
      यावेळी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबईच्या चमुने महाराष्ट्र लोक परंपरा या कार्यक्रमाचे सादरीकरण केले. गणा ने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. देशाच्या विविध भागातून आलेल्या प्रेक्षकांना समजावा म्हणून खास हिंदी भाषेत पोवाडा सादर करण्यात आला. औरंगाबाद येथील शाहीर सुरेश जाधव यांनी डफावर थाप मारत  छत्रपती शिवाजी महाराजांच्या शुरगाथा कथन करण्यास सुरुवात केली, तोच उपस्थितांनी  टाळयावाजवत पोवाडयाला उत्सफुर्त दाद दिली. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचे दर्शन घडविणा-या वासुदेव, दिंडी या लोककलांच्या सादरीकरणाने येथे उपस्थित देश-विदेशातील रसिक प्रेक्षकांच्या टाळया मिळवल्या. महाराष्ट्राच्या कडा-कपारीत राहणा-या ठाकर जमातीचे दर्शन घडाविणारे नृत्य, संताच्या अध्यात्मिक विचार उलगडणारे भारूड, श्रीकृष्णाच्या लींलावर आधारीत गण-गौडण आदींनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. विविध लोककला व लोकनृत्यांचा आविस्कार असणार्‍या या कार्यक्रमात महाराष्ट्राचे प्रतिबींबच उभे राहिले आणि यास उपस्थितांचा भरभरून प्रतिसाद लाभला.                             

                               …….*……..

No comments:

Post a Comment