Tuesday 29 December 2015

दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडून 3 हजार 50 कोंटीची महाराष्ट्राला मदत

आतापर्यंतची सर्वात मोठी मदत : मुख्यमत्र्यांनी मानले पंतप्रधानांचे आभार


नवी दिल्ली, 29 : महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी  केंद्रशासनाकडून आज 3 हजार 50  कोटींची मदत जाहीर करण्यात आली. देशातील नैसर्गिक आपत्तीमुळे दुष्काळाला सामोरे जाणा-या राज्यांसाठी गठीत करण्यात आलेल्या उच्चाधिकार समितीने ही घोषणा केली. ही आतापर्यंतची महाराष्ट्राला मिळालेली सर्वाधिक मदत असून यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहे.
          आज   उच्चाधिकार समितीची बैठक केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेत पार पाडली. या बैठकीत कृषी मंत्री राधा मोहन सिंग, निती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पांगरिया, केंद्रीय वित्त राज्य मंत्री जयंत सिन्हा, केंद्रीय गृह सचिव राजीव मेहरीश आणि अन्य वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
          राष्ट्रीय आपत्ती निधीतून महाराष्ट्राला 3 हजार 50 कोटींची तर मध्य प्रदेशला दुष्काळी भागातील उपाययोजनांसाठी 2 हजार 33 कोटींची मदतीची घोषणा करण्यात आली.
      महाराष्ट्रामध्ये गेल्या 3 वर्षांपासून सतत दुष्काळी परिस्थितीती आहे. केंद्रीय पथकाने चमूने महाराष्ट्रातील दुष्काळ भागाची पाहणी  केली होती. या पथकाने आपला अहवाल सादर केल्यानंतर आज 3 हजार 50 कोटी रूपयांच्या मदतीची ही घोषणा करण्यात आली.
आतापर्यंतची सर्वात मोठी मदत : मुख्यमंत्री
महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी केंद्रशासनाकडून आज 3 हजार 50 कोटींची मदत जाहीर करण्यात आली. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची घोषणा असून दुष्काळाच्या सावटातील शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे. आतापर्यंतचीही  सर्वातमोठी मदतअसून यासाठी केंद्र सरकारचे आम्ही जाहीर आभार व्यक्त करतो अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांनी आपली प्रतिक्रीया व्यक्त केली.
उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंग, कृषी मंत्री राधा मोहन सिंग, निती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पांगरिया, केंद्रीय वित्त राज्य मंत्री जयंत सिन्हा, केंद्रीय गृह सचिव राजीव मेहरीश आदी सर्वांचे त्यांनी यासाठी आभार मानले.  मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंग यांना स्वत: दूरध्वनी करून राज्याला दिलेल्या दुष्काळ निवारण निधीकरिता धन्यवादही दिले.

No comments:

Post a Comment