Wednesday 30 December 2015

माळढोक पक्षी अभयारण्याचे क्षेत्र 400 चौ.कि.मी.करणार : प्रकाश जावडेकर



नवी दिल्ली 30 : माळढोक अभयारण्याचे क्षेत्र 1229 चौरस किलोमीटर वरून 400 चौरस किलोमीटीर करण्याचा महत्वपूर्ण निर्णय वन व पर्यावरण मंत्रालयाने घेतला आहे. या निर्णयामुळे सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यातील शेतक-यांना लाभ होईल.
     वन व पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज इंदिरा पर्यावरण भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने केलेल्या शिफारशीनुसार माळढोक अभयारण्याचे क्षेत्र कमी करण्यात येत असल्याचे सांगून माळढोक पक्ष्यांची संख्या 4 इतकी आढळून आली आहे. आता हे क्षेत्र पर्यावरण संवेदनशील क्षेत्रम्हणून घोषीत करण्यात येईल, या संदर्भात लवकरच अधिसूचना काढण्यात येईल, अशी माहितीही श्री जावडेकरांनी  यावेळी दिली.
       माळढोक पक्ष्यांची संख्या कमी होत असल्याने अभयारण्याचे क्षेत्र कमी करावे, अशी मागणी करण्यात येत होती. अभयारण्याचे क्षेत्र हे आरक्षित क्षेत्र असल्यामुळे या क्षेत्रात जमीन खरेदी विक्री, विहीर खोदणे, बांधकाम करणे यावर निर्बंध घालण्यात आले होते. आता अभयारण्याचे क्षेत्र कमी केल्यामुळे सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यातील शेतक-यांना जमीन विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
       सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील 59 गावातील 27 हजार 357 हेक्टर क्षेत्र  व करमाळा तालुक्यातील  38 गावांचे सुमारे  11 हजार 237 हेक्टर क्षेत्र माळढोक  अभयारण्यात येत होते. अभयारण्याचे क्षेत्र कमी करण्याच्या निर्णयाचा  लाभ अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील शेतक-यांना होणार आहे.
अभयारण्य विकासाकरिता महाराष्ट्राला 1 कोटी 38 लाख रूपये मंजूर

माळढोक अभयारण्याच्या विकासाकरिता महाराष्ट्राला 1 कोटी 38 लाख रूपये मंजूर करण्यात आले असून 1 कोटी 10 लाख रूपयांचा निधी राज्यशासनाकडे वर्ग करण्यात आला. अशी माहिती प्रकाश जावडेकर यांनी आज दिली.
      माळढोक पक्षी हे फक्त महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात या राज्यातच आढळून येतात. दिवसेंदिवस हे पक्षी लुप्त होत आहेत. ही गंभीर बाब असून यावर अभ्यास करण्याकरिता पर्यावरण मंत्रालयाने एक तज्ञ समिती नेमली होती. या समितीने आपला अहवाल सादर केला असून त्यांच्या महत्वपूर्ण शिफरशी लागू करण्याचा निर्णय पर्यावरण मंत्रालयाने घेतला आहे.

      तज्ज्ञ समितीने नोदंविल्याप्रमाणे महाराष्ट्रातील माळढोक अभयारण्यात 1980 च्या आसपास माळढोक पक्ष्यांची संख्या 400-500 होती ती आता अंत्यत कमी झालेली आहे. माळढोक पक्षांसाठी गवताळ जमीनीची आवश्यकता असते. अभारण्याचे परिघ क्षेत्र कमी करून जास्तीत जास्त गवताळ जमीनीचे टप्पे तयार करणे. यासह माळढोक पक्षांच्या अंडीचे संरक्षण, संवर्धन करून अधिक माळढोक पक्षी जन्माला येतील यांची काळजी घेण्यात येईल. पहिल्या 5 वर्षाकरिता हा प्रयोग करून माळढोक पक्ष्यांची संख्या वाढविण्यावर भर देण्यात येईल. स्थानिक जनतेत जागृती निर्माण करून त्यांच्या सहायाने पक्ष्यांचे संवर्धन आणि संख्येत वाढ करण्यावर भर देण्यात येईल. 

No comments:

Post a Comment