Wednesday 30 December 2015

पाडगांवकरांची स्मृती कायम ठेवण्यासाठी विशेष योजना आणणार -विनोद तावडे



नवी दिल्ली, दि. ३० : आपल्या अमोघ शब्द सामर्थ्याने मराठी साहित्यात मोलाचे योगदान देणा-या कवीवर्य, महाराष्ट्र भूषण मंगेश पाडगांवकर यांची स्मृती अबालवृध्दांमधे कायम ठेवण्यासाठी राज्यशासनाचा सांस्कृतिक विभाग एक विशेष योजना आणणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्य व मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडे यांनी येथे केली.
        शासकीय बैठकीसाठी दिल्ली भेटीवर आलेल्या श्री. तावडे यांनी कवीवर्य मंगेश पाडगांवकरांच्या निधनाबाबत प्रसार माध्यमांशी बोलतांना ही माहिती दिली.  ते म्हणाले, पाडगांवकर हे अलौकिक प्रतिभेचे धनी होते. त्यांच्या जाण्याने साहित्य विश्वाचे मोठे नुकसान झाले. माणसाचे दु:ख विसरायला लावून चेह-यावर हसू निर्माण करण्याची किमया त्यांच्या शब्दात होती.
 संत कबीरांच्या दोहयांचा पाडगांवकरांनी केलेला भावानुवाद मला स्वत: फार भावला. सामाजिक व राजकीय विषयांवर भाष्य करणारे पाडगांवकरांचे उदासबोधअसो किंवा लहाण मुलांना खिळवून ठेवणारे सांग सांग भोलानाथ हे बालगीत असो त्यांचा रसिक हा सर्व वयोगटातील आहे. पाडगांवकरांशी मी जेव्हा जेव्हा भेटलो तेव्हा साहित्या बरोबरच त्यांची जागतिक घडामोडींशीही नाड जुळली असल्याचे मला जाणवले. राज्यशासनाच्या सांस्कृतिक व मराठी भाषा विभागाच्यावतीने मी पाडगांवकरांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पित करतो असे ते म्हणाले.  


                   दिल्लीतून मान्यवरांनी वाहिली पाडगांवकरांना श्रध्दांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्वीट संदेशामधे मराठीतील ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांच्या कवितांनी अनेकांना प्रेरणा दिल्याचे म्हणत त्यांच्या निधनाने दु:ख झाल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी शोक संदेशात म्हटले की, मंगेश पाडगांवकर यांच्या निधनाने मराठी कवीतांवर प्रेम करणा-या असंख्य रसिकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आयुष्यभर आशयगर्भ व गेय कवितांची निर्मिती करून बाल कवी व निसर्ग कवी म्हणून त्यांनी ख्याती प्राप्त केली. त्यांच्या कवीतांच्या माध्यमातून ते अजरामर राहतील.
रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांनी आपल्या ट्वीटर संदेशामधे मंगेश पाडगांवकर हे साहित्य क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तीमत्च होते अशा भावना व्यक्त केल्या आहेत.  पाडगांवकरांच्या लेखनाने मराठी रसिकांना आनंद दिला त्यांच्या कलाकृती अमर आहेत. 
केंद्रीय वने व पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, मंगेश पाडगांवकरांनी महाराष्ट्राला कवीतेचे वेड लावले. त्यांच्या निधनाने मराठी जनतेला चटका बसला.

                                                                         ००००० 

No comments:

Post a Comment