Thursday, 14 January 2016

दिल्ली हाट येथे दि. १७ ते ३१ जानेवारी या कालावधीत ‘महा जत्रा’




 नवी दिल्ली, 14 : महाराष्ट्राच्या हस्तकेलेचे प्रदर्शन आणि विक्री, सांस्कृतिक कला आणि लोककला यांचे सादरीकरण अशा भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल असलेल्या महा-जत्रा महोत्सवाचे आयएनएस्थित दिल्ली हाट येथे १७ जानेवारी पासून आयोजन करण्यात आले आहे. 

            महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख देशातील जनतेला व्हावी तसेच राज्यातील लघु उद्योजक, हस्तकला क्षेत्रातील कारागीरांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे या हेतूने देशाच्या राजधानीतील दिल्ली हाट या महत्वपूर्ण व्यापार व पर्यटन केंद्राच्या ठिकाणी दिनांक १७ ते ३१ जानेवारी २०१६ दरम्यानमहा-जत्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या सहकार्याने व अन्य शासकीय संस्थांच्या सहभागाने सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने हे आयोजन करण्यात येत आहे.

            विविध राज्यांच्या हस्तकलांची दालने दिल्ली हाट येथे वर्षभर खुली असतात परंतु पंधरा दिवसांकरिता महाराष्ट्राकडून संपूर्ण परिसर हा हस्तकला आणि सांस्कृतिक कला व लोककला यांनी व्यापून टाकण्याची ही पहिलीच वेळ आहे. प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन देसाई हे या परिसरात सजावट करीत आहेत.

            या महोत्सवात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाची ओळख करून देणा-या कार्यशाळा प्रथमच बघायला मिळणार आहेत. राज्याची ओळख असणारी पारंपारिक वारली चित्रकला, रांगोळी, आदिवासी मुखवटे तयार करणे आणि मातीचे किल्ले तयार करणे याबरोबरच नऊवारी साडी नेसणे अशा विषयांवर पर्यटकांसाठी कार्यशाळा घेण्यात येणार आहे. पर्यटनविषयक,लघुउद्योगांचे, बचत गटांचे, रेशीम उद्योग आणि हातमाग वस्त्रांचे स्टॉल्स या प्रदर्शनात असणार आहेत. येथे दिवसभर आणि सायंकाळी महाराष्ट्राच्या लोककला सादर करण्यात येणार आहे त्यासाठी  ८० कलाकारांचा चमू दिल्लीत दाखल होणार आहे.

            राष्ट्रीय स्तरावरील महत्वाच्या ऐतिहासिक आणि सामाजिक घडामोडीतील महाराष्ट्राच्या सहभागाशी संबंधित दुर्मिळ कागदपत्रांचे प्रदर्शन तसेच राज्य शासनाने प्रकाशित केलेली हिंदी व इंग्रजी पुस्तकांची विक्री आणि राज्याचा ऐतिहासिक वारसा कथन करणा-या वस्तूंचे प्रदर्शन हेही या महोत्सवाचे वैशिष्टय असणार आहे.

0000

No comments:

Post a Comment