नवी
दिल्ली दि. 14 : तृतीय पंथी आणि वैश्याव्यवसायातील व्यक्तींचा मतदानातील सहभाग
वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने उत्तम कार्य
केले अशा शब्दात देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. नसिम झैदी यांनी कौतुक केले.
येथील कॅनॉट प्लेस परिसरातील सेंट्रल पार्कमधे
केंद्रीय निवडणूक आयोगाच्यावतीने आयोजित मतदाता महोत्सवाचे उदघाटन डॉ. झैदी यांच्या
हस्ते झाले. उदघाटनानंतर त्यांनी या ठिकाणी देश भरातील विविध राज्यांच्या निवडणूक
अधिकारी कार्यालयाच्यावतीने उभारण्यात आलेल्या तसेच विविध देशांच्या दालनांस भेट
दिली. झैदी यांच्या सोबत निवडणूक आयुक्त ओमप्रकाश रावत आणि उप आयुक्त उमेश सिन्हा
उपस्थित होते.
डॉ. झैदी यांनी महाराष्ट्र निवडणूक
अधिकारी कार्यालयाला केंद्रीय निवडणूक आयोगाने तृतीय पंथी आणि वैश्याव्यवसायातील
व्यक्तींचा मतदानातील सहभाग वाढविण्यासाठी सोपविलेली जबाबदारी राज्यातील कार्यालय उत्तम प्रकारे पार पाडत असल्याबाबत
कौतुक केले. तृतीय पंथी आणि वैश्याव्यवसायातील व्यक्तींचा मतदानातील सहभाग
वाढविण्याचे अवघड काम महाराष्ट्रातील विविध भागात उत्तम प्रकारे झाले असून पुढील
वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
या महोत्सवात महाराष्ट्र राज्य मुख्य
निवडणूक अधिकारी कार्यालयाच्यावतीने “ महाराष्ट्रात तृतीय पंथी आणि
वैश्याव्यवसायातील व्यक्तींचा मतदानातील सहभाग” या विषयाची माहिती देणारे दालन
उभारले आहे. या वर्गाचा मतदानातील सहभाग वाढविण्यासाठी राबविण्यात आलेल्या विविध
उपक्रमांची माहिती दर्शविणारे आकर्षक कटआऊट, बॅनर्स, पोस्टर्स, फ्लेक्स, एलईडी
डिस्प्ले, इलेक्ट्रॉनीक स्क्रीन याठिकाणी लावण्यात आले आहेत. यासोबतच विविध
प्रकाशनेही येथे उपलब्ध आहेत. या महोत्सवात शनिवारी दिनांक १६ जानेवारी रोजी साजरा होणा-या
सांस्कृतिक कार्यक्रमात महाराष्ट्राच्यावतीने तृतीय पंथीय कलाकारांचा चमु
आपली कला सादर करणार आहे. महाराष्ट्र दालनात उपमुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड,
कक्षअधिकारी प्रसाद कुलकर्णी, तहसिलदार मिनल दळवी, नायब तहसिलदार राज तवटे यांचा
समावेश आहे.
आज पासून सुरु झालेला मतदाता महोत्सव
१७ जानेवारी पर्यंत दररोज सकाळी १० ते रात्री ८ वाजे पर्यंत सर्वांसाठी नि:शुल्क
खुला राहणार आहे.
000000
No comments:
Post a Comment