Saturday 27 February 2016

भाषा लवचीक असावी


नवी दिल्ली, २7 : भाषा ही लवचीक असावी. त्यामुळे भाषेला अधिकाधिक समृद्ध करता येते. असे प्रतिपादन मुख्यमंत्री यांचे जनसंपर्क अधिकारी हेमराज बागुल यांनी केले.
महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित मराठी भाषा दिनच्या कार्यक्रमात श्री बागुल बोलत होते. वि.वा.शिरवाडकर ऊर्फ कुसूमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासन मराठी भाषा दिन साजरा करते. यावेळी उपस्थितांनी कुसूमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
     या प्रसंगी पुणे माहिती विभागाचे उपसंचालक यशवंत भंडारे, महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे, मंचावर उपस्थित होते. यासह माहिती व जनसंपर्क विभागाच्या जळगाव कार्यालयाचे माहिती अधिकारी मिलिंद दुसाने, नांदेडचे माहिती अधिकारी निशिकांत तोडकर, परभणीचे माहिती अधिकारी  केशव करंदिकर तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.
श्री बागुल म्हणाले, भाषेत रोजच्या रोज सहज बोलता येणा-या शब्दांचे संग्रह झाले पाहिजे. त्यामुळे भाषाची शब्द संपदा वाढून ते शब्द समाजात रूढ होतात. यावरून भाषेची  सामाजिक, सांस्कृति प्रगतीही लक्षात येते. आज जगातील प्रमुख 12 भाषांमध्ये मराठीचा समावेश आहे. मराठी भाषा समृद्ध करण्याकरिता महाराष्ट्रातील प्रत्येक भागातील लोकांनी महत्वाची भुमिका निभावली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोगाने संगणक, मोबाईलवर मराठी लिहीणे अधिक सोपे झाले आहे. कोणतीही भाषा ही अंतस्थ उबेने जगते, ही ऊब आपल्यात सातत्याने तेवत ठेवावी असा आग्रही श्री बागुल यांनी यावेळी केला.
सर्वहारा समाजातील वाचक वर्ग वाढत आहे. वर्तमानात कुठल्याही साहित्य संमेलनात, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमात वाढती पुस्तकांची दालने बघता मराठी भाषेला कधी नव्हते इतके चांगले दिवस आता आहेत, असे पुणे विभागातील उपसंचालक यशवंत भंडारे म्हणाले. शासनही मराठी भाषा वाढविण्याकरिता विविध प्रयत्न करीत असल्याचे श्री भंडारे यांनी सांगितले. उपसंचालक श्री कांबळे यांनीही यावेळी मराठी भाषेसंदर्भात आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे संचलन तसेच आभार माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे यांनी केले. 

No comments:

Post a Comment