Friday, 26 February 2016

प्रभावी जनसंपर्कातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचता येते : सुभाष देसाई - राष्ट्रीय जनसंपर्क कार्यशाळेचा समारोप



नवी दिल्ली, २६ : आधुनिक माध्यमांच्या बदलत्या काळात शासनाच्या योजनांची माहिती प्रभावी जनसंपर्काच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवता येते असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केले.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने हॉटेल रॉयल प्लाझा येथे दिनांक २३ ते २६ फेब्रुवारी २०१६ दरम्यान ‘शासनातील जनसंपर्क’ विषयावर आयोजित राष्ट्रीय जनसंपर्क कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे मंचावर उपस्थित होते.
श्री. देसाई म्हणाले, जनतेसाठी शासन उत्तमोत्तम योजना तयार करते. त्या योजना जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम विविध राज्यांच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्यावतीने केले जाते. पण दिवसेंदिवस प्रसार माध्यमांचा होत असलेला विस्तार बघता जनतेपर्यंत पोहचण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान व पध्दती विकसीत करून त्याची अंमलबजावणी करणे गरजेचे असते. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाअंतर्गत कार्य करणा-या महाराष्ट्र परिचय केंद्राने या दिशेने सकारात्मक पाऊल उचलत देशाच्या राजधानीत राष्ट्रीय जनसंपर्क कार्यशाळेचे आयोजन करून नवीन सुरुवात केली आहे.
कार्यशाळेत सहभागी विविध राज्यांतून व महाराष्ट्रातून आलेल्या अधिका-यांना याचा फायदा होणार असून अशा कार्यशाळांमुळे विचारांची आदान- प्रदान होऊन कार्यशैली विकसित करण्यास मदत होते असेही ते म्हणाले. जनतेसाठी एखादी योजना तयार करताना तिच्या प्रसिध्दीसाठी निधींचे नियोजन करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र शासनाने मुंबईत नुकत्याच आयोजित केलेल्या मेक इन इंडिया सप्ताहाच्या यशस्वीतेबाबतही त्यांनी यावेळी माहिती दिली.
उपसंचालक दयानंद कांबळे यांनी प्रास्ताविक भाषणात सांगितले , या कार्यशाळेत सहभागी प्रत्येक अधिकारी हा त्या-त्या राज्यांचा इमेज बिल्डींग करणारा दूत आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून माहिती व जनसंपर्क विभागात कार्यकरणा-या देशभरातील अधिका-यांना जोडण्याचे काम झाले आहे. शासनाच्या प्रभावी जनसंपर्कासाठी या कार्यशाळेचा उपयोग होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते कार्यशाळेत सहभागी झालेल्या महाराष्ट्राच्या माहिती व जनसंपर्क विभागातील वरिष्ठ अधिका-यांस विविध राज्यांच्या अधिका-यांना प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन अर्चना मिरजकर यांनी केले तर महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंपादक रितेश भुयार यांनी आभार प्रदर्शन केले.
राष्ट्रीय कार्यशाळेत महाराष्ट्राच्या माहिती व जनसंपर्क विभागातील वरिष्ठ अधिका-यांसह राजस्थान, झारखंड, उत्तराखंड, पंजाब, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, गोवा, गुजरात, मध्यप्रदेश, तेलंगाना,कर्नाटक, तामीळनाडू, आसाम, सिक्कीम, मणिपूर, दिल्ली, नागालँड, अंदमान व निकोबार या राज्य व केंद्रशासीत प्रदेशांतून माहिती व जनसंपर्क विभागाच्या अधिका-यांनी सहभाग घेतला होता.
कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी पहिल्या सत्रात ‘सामाजिक माध्यमे आणि जनसंपर्क’ या विषयावर नॅशनल मिडीया सेंटरचे संचालक बी. नारायण यांनी तर ‘ब्लॉगींग एण्ड पर्सनल ब्रँण्डींग’ या विषयावर सुनिता बिध्दू यांनी मार्गदर्शन केले. तर दुपारच्या सत्रात ‘ कटेंट ड्रिस्टीब्युशन इन टुडेच मोबाईल वर्ड’ या विषयावर रजनील यांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या दुस-या दिवशीच्या पहिल्या सत्रात ‘पीआर एण्ड इमेज बिल्डींग’ या विषयावर दिलीप चेरियन यांनी मार्गदर्शन केले, प्रतिक शाह यांनी ‘डिजीटल ब्रँडींग’ विषयावर मार्गदर्शन केले. तर दुपारच्या सत्रात आरती जैन यांनी ‘युज ऑफ ऑडीओ व्हिज्युअल मिडीया’ या विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या तिस-या दिवशीच्या पहिल्या सत्रात दिल्ली मेट्रोचे कार्यकारी संचालक अनुज दयाल यांनी ‘ब्रँडींग ऑफ दिल्ली मेट्रो’ विषयावर मार्गदर्शन केले, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक अजय अंबेकर यांनी ‘फ्रेमवर्क फॉर इफेक्टीव ॲण्ड इफिसियंट मिडीया’ या विषयावर मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात राजेश अग्रवाल यांनी ‘मोटीवेशनल टॉक’ या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या समारोप दिनी सहभागी अधिका-यांनी ‘माय बेस्ट पीआर प्रॅक्टीस’ या विषयावर सादरीकरण केले.
या कार्यशाळेच्या विविध सत्रांचे लाईव्ह वेबकास्ट उपलब्ध करून देण्यात आले असून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या www.mahanews.gov.in या संकेतस्थळावर रेकॉर्डेड वेबकास्टची लिंक देण्यात आली आहे.
0000000

No comments:

Post a Comment