Monday, 18 April 2016

जळगावच्या डिजीटल गुड्डा-गुड्डी उपक्रमाचे राजधानीत सादरीकरण



नवी दिल्ली, १९ : केंद्र सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढाओअभियानंतर्गंत कौतुकास्पद ठरलेल्या जळगाव जिल्हयातील डिजीटल गुड्डा गुड्डीउपक्रमाच्या यशकथांचे सादरीकरण जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल करणार आहेत.

            केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्यावतीने दिनांक १९ एप्रिल २०१६ ला विज्ञानभवनात आयोजित एकदिवसीय संमेलनात श्रीमती अग्रवाल हे सादरीकरण करणार आहेत. देशातील मुलींची कमी होणारी  संख्या थांबविण्याच्या आणि मुलींना शिक्षीत करण्याबाबत जनजागृती करण्यासाठी केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्यावतीने बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान देशभर सुरु झाले. या अभियानाची वर्षपूर्ती आणि देशातील ६५ जिल्हयांचा  नव्याने या अभियानात समावेश करण्यात येणार आहे. केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री मनेका गांधी यांच्या हस्ते संमेलनाचे उदघाटन होणार असून दुपारच्या सत्रात बेटी बचाओ बेटी पढाओअभियान यशस्वीपणे राबविलेल्या देशातील  प्रमुख ५ प्रकल्पांचे सादरीकरण होणार आहे. जळगाव जिल्हयातील प्रकल्पाची यात निवड झाली आहे. जळगांवच्या जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल या प्रकल्पाचे सादरीकरण करणार आहेत.

जळगाव जिल्हयात प्रशासनातर्फे बेटी बचाओ बेटी पढाओअभियानाच्या जनजागृतीसाठी डिजीटल गुड्डा-गुड्डी संकल्पना मांडून तिची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली. या माध्यमातून ऑनलाईन जोडणीनंतर मुला-मुलींच्या जन्मदराचे अवलोकण करता येणे शक्य होते. हे एक ऑडीओ व्हिज्युअल डिस्प्ले युनिट असून बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचा लोगो असलेला मुलीचा चेहरा वापरुन शाळेत जाणा-या मुलीचा लाकडी कटआऊट बनविण्यात आला आहे. या मुलीच्या हातातील शाळेच्या पाटीच्या आकारात एक १७ इंची डिजीटल डिस्प्ले बसविण्यात आला आहे. या डिस्प्ले वर मान्यवरांचे संदेश, स्त्री भ्रूण हत्या विरोधी जनजागृतीपर संदेश, महिला सक्षमीकरणाबाबतच्या योजना, महिलांसंदर्भात महत्वाचे असणारे टोल फ्री क्रमांक आदी माहिती यावर प्रसारीत केली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री मनेका गांधी यांनी जळगाव जिल्हयातील या अनोख्या डिजीटल गुड्डा-गुड्डी उपक्रमाचे कौतुक केले आहे. दि.१ ते ७ जुलै२०१५ दरम्यान राबविलेल्या डिजीटल इंडिया अभियानाचा सर्वोत्तम उपक्रम म्हणून जळगावच्या या उपक्रमाला स्वीकारण्यात आले होते हे उल्लेखनीय आहे.  
                                                                  ******
                                                          



No comments:

Post a Comment