Tuesday, 19 April 2016

जळगावच्या डिजीटल गुड्डा-गुड्डी उपक्रमाचे राजधानीत कौतुक

    
नवी दिल्ली, १९ : जळगाव जिल्हयात डिजीटल गुड्डा गुड्डी बोर्ड उभारून बेटी बचाओ बेटी पढाओ’ उपक्रमाच्या जनजागृती कार्याबाबत जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांनी केलेल्या सादरीकरणाचे राजधानीत कौतुक झाले. तसेच, बेटी बचाओ बेटी पढाओअभियानात महाराष्ट्रातील ६ जिल्हयांचा नव्याने समावेश करण्यात आला.  
केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्यावतीने विज्ञानभवनात आज आयोजित एकदिवसीय संमेलनात श्रीमती अग्रवाल यांनी डिजीटल गुड्डा गुड्डी उपक्रमाबाबत  सादरीकरण केले. त्यांनी सांगितले, गेल्यावर्षी २२ फेब्रुवारी रोजी जिल्हयात ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाची सुरुवात झाली.केंद्र सरकारच्या डिजीटल इंडीया उपक्रमाअंतर्गत आम्ही या अभियानाला जनतेपर्यंत घेऊन जाण्यासाठी डिजीटल गुड्डा गुड्डी’ बोर्ड तयार केले. ‘बेटी बचाओ बेटीपढाओ’अभियानाच्या लोगोचा उपयोग करून तयार केलेल्या या डिजीटल बोर्डला  ऑनलाईन जोडणीकरुन मुला-मुलींच्या जन्मदराचे अवलोकण करता येणे शक्य झाले. हे एक ऑडीओ व्हिज्युअल डिस्प्ले युनिट असून त्यासाठी शाळेत जाणा-या मुलीचा कटआऊट बनविण्यात आला. या मुलीच्या हातातील शाळेच्या पाटीच्या आकारात एक १७ इंची डिजीटल डिस्प्ले बसविण्यात आला. या डिस्प्ले वर मान्यवरांचे संदेश,स्त्री भ्रूण हत्या विरोधी जनजागृतीपर संदेश, महिला सक्षमीकरणाबाबतच्या योजना, महिलांसंदर्भात महत्वाचे असणारे टोल फ्री क्रमांक आदी माहिती प्रसारीत केली जाते. जिल्हा व तालुका स्तरावरील शासकीय कार्यालयांमधे हे बोर्ड  बसविण्यात आले असून ग्रामपंचायत व  आरोग्य केंद्रामधेंही बोर्ड बसविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री मनेका गांधी यांनी जळगाव जिल्हयातील या अनोख्या डिजीटल गुड्डा-गुड्डी उपक्रमाचे कौतुक केले आहे. केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाने जुलै २०१५ दरम्यान राबविलेल्या डिजीटल इंडिया अभियानाचा सर्वोत्तम उपक्रम म्हणून जळगावच्या या उपक्रमाला स्वीकारण्यात आले होते .  

 याशिवाय माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमाच्या माध्यमातून, आकाशवाणीच्या माध्यमातून, विविध स्पर्धांचे आयोजन करून, लघुपट, रोड शोज आणि सोशियल मिडीयाच्या माध्यमातूनही या अभियानाविषयी जनजागृती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
जळगावचे खासदार ए.टी.नाना पाटील आणि रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार रक्षा खडसे यांनीही या कामी पुढाकार घेतल्याचे त्यांनी सांगितले.बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियान यशस्वीपणे राबविलेल्या महाराष्ट्रासह देशातील प्रमुख ८ प्रकल्पांचे सादरीकरण यावेळी झाले.
                                            महाराष्ट्रातील ६ जिल्हयांची निवड
            बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानासाठी देशातील ६१ जिल्हयांची आज निवड करण्यात आली. यात, महाराष्ट्रातील हिंगोली, सोलापूर, पुणे, परभणी, नाशिक आणि लातूर या  ६ जिल्हयांचा समावेश आहे. गेल्यावर्षी देशातील १०० जिल्हयांमधे हे अभियान राबविण्यात आले. यात महाराष्ट्रातील बीड, जळगांव, अहमदनगर, बुलडाणा,औरंगाबाद,वाशिम,कोल्हापूर,उस्मानाबाद, सांगली, जालना या १० जिल्हयांचा समावेश होता. ज्या जिल्हयांमधे मुलींचा जन्मदर हजार मुलांमागे कमी आहे अशा जिल्हयांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.  
                                महाराष्ट्राच्या कामाचे मनेका गांधी यांनी केले कौतुक  
तत्पूर्वी, केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री मनेका गांधी यांच्या हस्ते संमेलनाचे उदघाटन झाले. सचिव सोमसुंदरम यावेळी उपस्थित होते. श्रीमती गांधी यांनी आपल्या उदघाटनपर भाषणात महाराष्ट्रातील जळगांव जिल्हयामधे राबविण्यात येतअसलेल्या डिजीटल गुड्डा गुड्डी उपक्रमाचे कौतुक केले. देशातील विविध राज्यांमधे मोक्याच्या ठिकाणी असे डिजीटल गुड्डा गुड्डी’ उभारून जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. महाराष्ट्रातील काही भागांमधे मुलींच्या जन्माचा आनंद व्यक्त करण्यासाठी मुलीच्या आई –वडीलांना दोन रोपटे आणि हापूस आंबे देण्याचा उपक्रम राबविण्यात येत असून हा कौतुकास्पद उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानांतर्गत देशातील विविध राज्यांमधे घडून आलेले सकारात्मक बदल दर्शविणा-या पुस्तीकेचे विमोचन श्रीमती गांधी यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. यात देशातील २० राज्यांमधील यशकथांचा समावेश असून महाराष्ट्रातून जळगाव जिल्हयाच्या ‘डिजीटल गुड्डा गुड्डी’ उपक्रमाचा समावेश आहे. देशातील आरोग्य व शिक्षण विभागाचे सचिव आणि विविध जिल्हाधिकारी या संमेलनात सहभागी झाले होते. महाराष्ट्रातून लातूरचे जिल्हाधिकारी पांडुरंग पोळ, हिंगोलीचे जिल्हाधिकारी तुकाराम कासार आणि जळगांवच्या जिल्हाधिकारी  रुबल अग्रवाल सहभागी झाल्या.                                                                                    
                                                                  ******


No comments:

Post a Comment