Wednesday, 27 April 2016

देशातील दुष्काळग्रस्त भागात जलसंवर्धनाची कामे हाती घेणार : नितीन गडकरी

                                                                                

नवी दिल्ली, २७: देशातील दुष्काळग्रस्त भागात जलसंवर्धनाच्या कामाला गती  देणार असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी दिली , तसेच राज्यातील २८ सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी येत्या ३ मे रोजी मुंर्बत बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले

         केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने देशातील दुष्काळग्रस्त भागांत रस्त्यांच्या कामांअंतर्गत जलसंवर्धनाचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला  आहे. यासंदर्भात माहिती देण्यासाठी ट्रान्सपोर्ट भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्री. गडकरी यांनी ही माहिती दिली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने देशातील दुष्काळी राज्यांमधे शेतक-यांच्या सहमतीने मोफत शेततळी  बांधण्यात येणार आहेत.

दुष्काळी भागात शेततळे, नाला खोलीकरणाच्या कामातून निघणारी माती व मुरूम हे रस्ते बांधकामासाठी वापरण्यात येईल. यामुळे शेतक-यांना त्यांच्या शेतात खोदलेल्या तळयांमधे पावसाचे पाणी साठवणे शक्य होईल तर दुसरीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, राष्ट्रीय रस्ते पायाभूत सुविधा विकास महामंडळ यांना रस्ते बांधणी आणि रूंदीकरणासाठी मोफत माती उपलब्ध होणार आहे.

            भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने देशातील विविध भागांमध्ये महामार्गांच्या विकासाची कामे हाती घेतली आहेत. या कामांसाठी रस्ते बांधकाम कंत्राटदारांना नियमितपणे मातीची आवश्यकता भासते. ही माती कंत्राटदारांना संबंधित राज्य सरकारांच्या तरतूदीनुसार छोटया- मोठया खनिकर्मातून योग्‍य मोबदला देऊन संपादित करावी लागते. याला फाटा देऊन ग्रामीण भागात जल संवर्धनाची कामे हाती घेऊन मोठया प्रमाणावर मातीची आवश्यकता भागवणे शक्य आहे. मोठया प्रमाणात शेततळयांचे काम झाल्याने देशात जलसंवर्धनाची मोठी व्यवस्था निर्माण होऊन त्यातून दुष्काळाच्या स्थितीवर मात करता येईल असेही त्यांनी सांगितले.

                   राज्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी ३ मे रोजी मुंबईत बैठक

वेगवर्धित सिंचन लाभ योजनेअंतर्गत(एआयबीपी) महाराष्ट्रातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांबाबतच्या अडचणी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय जलसंपदामंत्री उभा भारती, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्यात मुंबईतील सहयाद्री अतिथीगृहात येत्या ३ मे रोजी एक बैठक होणार असल्याची माहिती श्री. गडकरी यांनी यावेळी  दिली. देशातील १० राज्यांमधे दुष्काळ असून दुष्काळाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने ‘वेगवर्धित सिंचन लाभ योजना’ तयार केली आहे. ८० हजार कोटी  रूपयांच्या  या योजनेअंर्तगत ४ वर्षात देशातील एकूण ८९ सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील २८ सिंचन प्रकल्पांचा यात समावेश आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंर्तगत राज्यातील कालव्यांची रखडलेली कामे पूर्ण करण्याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे.  

*********

No comments:

Post a Comment