Thursday, 21 April 2016

महाराष्ट्राची ‘जलयुक्त शिवार योजना’ शेतक-यांच्या हिताची : अजित जोशी



नवी दिल्ली, २१ : महाराष्ट्राने सुरु केलेली जलयुक्त शिवार योजनाशेतक-यांच्या हिताची आहे, असे  प्रतिपाद सोलापूरचे सुपूत्र व चंदीगडचे जिल्हाधिकारी अजित जोशी यांनी केले.  
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अजीत जोशी यांना सर्वोत्कृष्ट जिल्हाधिका-याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यानिमित्ताने महाराष्ट्र परिचय केंद्रात कौतुक समारंभाचे आयोजन करण्यात आले त्यावेळी श्री. जोशी बोलत होते. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन श्री. जोशी यांचा सत्कार केला. 
यावेळी श्री. जोशी यांनी उपस्थितांशी संवाद साधला. ते म्हणाले, महाराष्ट्रात पाण्याच्या समस्येवर कायम स्वरूपी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने सुरु झालेली जलयुक्त शिवार योजना महत्वाची असून त्याचा राज्याला मोठा फायदा होईल. गेल्या १२ वर्षांपासून हरियाणा शासनामधे काम करीत असताना या राज्यात सिंचनाबाबत झालेले उत्तम काम व त्याचे चांगले परिणाम याविषयी त्यांनी माहिती दिली.  
देशात जनधन योजनेची सर्वात प्रभावी व विक्रमी अंमलबजावणी केल्याबद्दल श्री.जोशी यांना पंतप्रधान पुरस्कार प्रदान करण्यात आला. याबाबत बोलताना त्यांनी केलेल्या रचनात्मक व वैविद्यपूर्ण कामाची माहिती उपस्थितांनी जाणून घेतली. श्री. जोशी, हे २००३ च्या प्रशासकीय सेवेच्या तुकडीचे अधिकारी असून, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत महाराष्ट्रात अव्वल तर देशात २९ वा  क्रमांक मिळविणा-या जोशी यांची गेल्या १२ वर्षांची प्रशासकीय कारकीर्द उल्लेखनीय राहिली आहे. त्यांच्या कार्याबाबत यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना श्री. जोशी यांनी दिलखुलास उत्तर दिली. 
           महाराष्ट्र परिचय केंद्र करीत आहे लोकांना जोडण्याचे काम  
दिल्ली शेजारील हरियाणा राज्यात काम करताना दिल्लीला शासकीय कामानिमित्त येणे होते. येथील महाराष्ट्र परिचय केंद्राला काही वेळा भेट देण्याचा योग आला. या कार्यालयाने महाराष्ट्रा बाहेरील मुख्यत: दिल्ली व दिल्लीच्या परिसरातील मराठी माणसांना जोडण्याचे मोलाचे काम केले असे गौरवोद् गार श्री. जोशी यांनी काढले. परिचय केंद्र राबवित असलेल्या वैविद्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक करत त्यांनी परिचय केंद्राच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
परिचय केंद्राचे अधिकारी-कर्मचारी, पत्रकार,  कार्यालयाला भेट देणारे अभ्यागत यावेळी उपस्थित होते.
                                 

*********

No comments:

Post a Comment