Saturday, 23 April 2016

महाराष्ट्रातील १७ स्थानिक स्वराज्य संस्थांचा होणार सन्मान


नवी दिल्ली, २३ : पंचायतीराज व्यवस्थेच्या विकेंद्रीकरणासाठी केलेल्या उल्लेखनीय कामासाठी महाराष्ट्रातील १७ स्थानिक स्वराज संस्थांचा ‘पंचायत सक्षमीकरण’ पुरस्काराने सन्मान होणार आहे.
केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाच्यावतीने झारखंड राज्यातील जमशेदपूर येथील जे.आर.डी. टाटा क्रीडा संकुलात रविवार, दिनांक २४ एप्रिल २०१६ रोजी राष्ट्रीय पंचयातीराज दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्राला मिळणारा पंचयातीराज व्यवस्थेच्या विकेंद्रीकरणाचा देशातील दुस-याक्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे पुरस्कार स्वीकारणार आहेत. राज्यातील १७ स्थानिक स्वराज संस्थांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे.
सातारा जिल्हा परिषदेचा राष्ट्रीय सन्मान
केंद्रीय ग्रामीण विकास, पंचायतीराज तथा पेयजल आणि स्वच्छता मंत्री चौधरी बिरेन्द्र सिंह यांच्या हस्ते सातारा जिल्हा परिषद, वर्धा जिल्हयातील कारंजा(घाडगे) पंचायत समिती, सातारा जिल्हयातील कराड पंचायत समिती यांना राष्ट्रीय पंचायती सक्षमीकरण पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे.
१४ ग्रामपंचायतींचाही होणार सन्मान
भंडारा जिल्यातील लाखनी तालुक्यातील शिवनी ग्रामपंचायत,नाशिक जिल्हयातील दुगाव ग्रामपंचायत, चंद्रपूर जिल्हयातील ब्रहृमपुरी तालुक्यातील भूज आणि बल्लारपूर तालुक्यातील लवरी ग्रामपंचायती, सांगली जिल्हयातील तासगांव तालुक्यातील आरवडे आणि मातकुंटी ग्रामपंचायती आणि शिराळा तालुक्यातील वाडीभागाई ग्रामपंचायती, उस्मानाबाद जिल्हयातील उमरगा तालुक्यातील तालमोद ग्रामपंचायत,अहमदनगर जिल्हयातील राहता तालुक्यातील लोणी बुद्रुक ग्रामपंचायत, सिंधुदुर्ग जिल्हयातील मालवण तालुक्यातील गोळवण-कुमामे ग्रामपंचायत,नागपूर जिल्हयातील कामठी तालुक्यातील महालगाव आणि हिंगणा तालुक्यातील वागदरा ग्रामपंचायती, अकोला जिल्हयातील बारशीटाकळी तालुक्यातील बाभा ग्राम पंचायत. सातारा जिल्हयातील फलटण तालुक्यातील खर्डेवाडी या ग्रामपंचायतीला राष्ट्रीय पंचायती सशक्तीकरण पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. उल्लेखनीय काम करणा-या देशातील पंचायत व्यवस्थेतील १८३ संस्थाचा राष्ट्रीय पंचायती सक्षमीकरण पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते देशात पंचयातीराज व्यवस्थेत उत्तम कार्य करणा-या राज्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. हे पुरस्कार विविध श्रेणीमधे देण्यात येणार आहेत. पंचायतराज व्यवस्थेच्या प्रभावी विकेंद्रीकरणासाठी महाराष्ट्राला दुस-या क्रमांकाचा ‘संचयी विकेंद्रीकरण सूचकांक पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. देशातील चार राज्यांची निवड करण्यात आली असून महाराष्ट्र हा दुस-या क्रमांकावर आहे. केरळ पहिल्या , कर्नाटक तिस-या तर सिक्कीम चौथ्या स्थानावर राहीले आहेत.
पंचायतराज व्यवस्थेत काम करणारे देशभरातील ३००० लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी या कार्यक्रमात सहभाग घेणार आहेत. राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीचे एकूण १६८ लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
केंद्रीय पंचायतीराज मंत्रालयाच्यावतीने वर्ष २०१० पासून ‘२४ एप्रिल’ हा राष्ट्रीय पंचायतीराज दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. प्रथमच दिल्ली बाहेर हा कार्यक्रम होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीदिनाचे औचित्य साधत १४ एप्रिल २०१६ रोजी मध्यप्रदेशातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महू या जन्मस्थानापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘ग्राम उदय से भारत उदय’ या अभियानाची देशभर सुरुवात झाली. देशातील सर्वच ग्रामपंचायतींमधे राबविण्यात आलेल्या या अभियानाचा समारोप २४ एप्रिल ला होणार आहे
*********

No comments:

Post a Comment