राजधानीत ‘महाराष्ट्र
दिन समारोहा’ ला सुरुवात
नवी दिल्ली, ३० : मराठी भाषा व संस्कृती जतन करण्यासाठी प्रत्येक
मराठी माणसाने पुढाकार घ्यावा असे आवाहन केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी
केले.
येथील रफी
मार्गस्थित मावळणकर सभागृहात आयोजित महाराष्ट्र दिन समारोहाला आज सुरुवात झाली,
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. प्रभू बोलत होते. लोकसभेच्या अध्यक्ष सुमीत्रा
महाजन, गोवा विधान सभेचे उपसभापती विष्णू
सूर्या वाघ, सार्वजनिक उत्सव समितीचे रा.मो.हेजीब आदी मान्यवर यावेळी उपस्थित
होते.
यावेळी
प्रभू म्हणाले, महाराष्ट्राबाहेर राहताना मराठी भाषा व संस्कृतीचे महत्व अधिक वाटायला
लागते. महाराष्ट्र दिनाच्या पूर्व संध्येला राजधानी दिल्लीत‘महाराष्ट्र दिन समारोहाला’ उपस्थित राहताना अत्यांनद
होत असल्याचे ते म्हणाले. मराठी साहित्य, नाटक, चित्रपट आदींनी मराठी संस्कृतीला
समृध्द करण्याचे काम केले आहे. मराठीचा हा समृध्द वारसा जतन करण्याची गरज असल्याचे
सांगत ,मराठी भाषा व संस्कृती जतन करण्यास प्रत्येक मराठी माणसाने पुढाकार
घेण्याचे आवाहन श्री. प्रभू यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे येथील बालगंधर्व संगीत
रसिक मंडळाचे सुरेश साखवळकर होते. उद्योजक
भोजराज तेली आणि लेखापाल विजकांत कुलकर्णी यावेळी मंचावर उपस्थित होते. श्री.
साखवळकर यांनी प्रास्ताविक केले तर श्री. तेली आणि श्री कुलकर्णी यांची यावेळी
भाषणे झाले. अवंती बायस यांनी आभार मानले.
सार्वजनिक उत्सव समिती, महाराष्ट्र राज्य
सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि महाराष्ट्र परिचय केंद्र यांच्या संयुक्त
विद्यमाने‘महाराष्ट्र दिन समारोह २०१६’
चे आयोजन करण्यात आले आहे.
उदघाटनाच्या
कार्यक्रमानंतर या समारोहाच्या पहिल्या दिवशी पुणे येथील संगीत रसिक मंडळ निर्मित ‘संत कान्होपात्रा’ या संगीत नाटकाचा प्रयोग सादर
झाला. या नाटकाचे लेखन ना.वि. कुलकर्णी यांनी केले असून मास्टर कृष्णराव यांनी
संगीत दिले आहे. या नाटकामधे सुरेश साखवळकर, अस्मिता चिंचाळकर, रविन्द्र कुलकर्णी,
कविता टिकेकर, निरंजन कुलकर्णी आदींच्या प्रमूख भूमिका साकारल्या .
*********
No comments:
Post a Comment