नवी दिल्ली, ०४ : ‘सैराट’
चित्रपटाची नायिका रिंकू राजगुरु ही चित्रपटातील तिच्या भूमिकेमुळे राज्यातील
मुलींसाठी ‘युवा आयकॉन’ ठरली असल्याचे
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर म्हणाल्या.
रिंकू राजगुरू आणि तिच्या आईने आज श्रीमती विजया
रहाटकर यांची, त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. श्रीमती रहाटकर यांनी रिंकूचा
सत्कार केला. मंगळवारी, रिंकू राजगुरू ला राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते
सैराट चित्रपटातील भूमिकेसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानीत करण्यात
आले. या पार्श्वभूमीवर झालेल्या भेटीत
श्रीमती रहाटकर यांनी रिंकूशी संवाद साधला. रिंकूला पदार्पणातच विशेष उल्लेखनीय
कामगिरीसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळणे ही अभिमानास्पद बाब असून ती ‘युवा आयकॉन’ ठरली असल्याचे त्या म्हणाल्या.
‘सैराट’ चित्रपटामुळे समाजाचे भीषण वास्तव समोर आले आहे. समाजात सकारात्मक बदल
घडवून आणण्यास या चित्रपटाची मदत होणार आहे. रिंकू च्या माध्यमातून मुलींना आपल्या
अधिकाराची जाणीव व्हावी आणि कायद्याच्या मदतीने त्या आपला हक्क मिळवतील असा
विश्वासही श्रीमती रहाटकर यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय
चित्रपट पुरस्कारात उत्कृष्ट शैक्षणिक लघूपटाचा मान मिळवणा-या ‘पायवाट’ या चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक मिथुनचंद्र चौधरी आणि
दिग्दर्शक नयना डोळस यांचाही सत्कार श्रीमती रहाटकर यांनी यावेळी केला.
000000
No comments:
Post a Comment