Friday, 3 June 2016

स्व. गोपीनाथ मुंडे अदभूत लोकसंपर्क असणारे नेते – प्रकाश जावडेकर





नवी दिल्ली, 03 : समाजातील दुर्बल, पिडित, शोषित व वंचित लोकांना सक्षम नेतृत्व देणारे स्व.गोपीनाथ मुंडे हे अदभूत लोकसंपर्क असणारे नेते होते, अशा शब्दात केंद्रीय वने व पर्यावरण  राज्यमंत्री प्रकाश जावडेकर  यांनी गोपीनाथ मुंडे यांना त्यांचा द्वितीय स्मृतीदिनी आदरांजली वाहिली.
स्व. गोपीनाथ मुंडे पुण्यस्मरण समितीच्यावतीने महाराष्ट्र सदन येथे स्व. गोपीनाथ मुंडे यांचा द्वितीय पुण्यस्मरण दिन आयोजित करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. खासदार अरविंद सावंत, राजू शेट्टी यावेळी मंचावर उपस्थित होते.
 जावडेकर म्हणाले, गोपीनाथ मुंडे यांनी समाजातील दुर्लक्षीत लोकांचे प्रश्न सोडवले. तळागाळातील लोकांकरिता काम करण्यासाठी ते सदैव तत्पर राहीले. १९७४ मधे श्री. मुंडें पुण्यात शिक्षणासाठी आले तेव्हा जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीने देशभरातील वातावरण भारावून गेले होते. पुण्यातील या चळवळीचे नेतृत्व श्री. मुंडेनी केले होते. यावेळी मला सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली होती. तेव्हाच मला श्री. मुंडेच्या नेतृत्व गुणाचा अनुभव आल्याचे श्री. जावडेकर यांनी सांगितले.  
 खासदार अरविंद सावंत म्हणाले , विधान परिषदेचा सदस्य म्हणून काम करताना मुंडे साहेबांचा १२ वर्ष सहवास लाभला. काही विषयांबाबत मतभिन्नता असली तरी संबंध कसे जपावे याचा वस्तूपाठ त्यांनी सहका-यांना व त्यांच्याशी संपर्कात आलेल्या अनेक माणसांना घालून दिला. मुंडे हे माणसांवर प्रेम करणारे नेते होते म्हणूनच ते लोकनेते ठरले
            खासदार राजू शेट्टी म्हणाले, मुंडे साहेबांनी शेतक-यांच्या प्रश्नांनाही वाचा फोडली त्यांनी शेतक-यांच्या चळवळींना बळ देण्याचे काम केले. त्यांच्या  नसण्याची जाणीव आजही होत असल्याचे त्यांनी सांगितले
             टीव्ही-९ मराठीचे दिल्ली प्रतिनिधी प्रशांत लिला रामदास, दैनिक सामनाचे निलेश कुलकर्णी, वैभव तांदळे  यांनीही गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजळा दिला व त्यांच्या व्यक्तीमत्वाचे इतर पैलु उलगडले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन महाराष्ट्र मी मराठी चे दिल्ली प्रतिनिधी  मनोज मुंडे यांनी  केले.  

                                      मान्यवरांच्या हस्ते  महाराष्ट्र सदनात वृक्षारोपण 

स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त महाराष्ट्र शासनाच्यावतीने ३ ते ९ मे दरम्यान पर्यावरण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहेयाचे औचित्य साधत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि  खासदार अरविंद सावंत यांनी महाराष्ट्र सदानाच्या परिसरात वृक्षारोपण केले.
             ००००




No comments:

Post a Comment