Saturday 4 June 2016

स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस’ची स्वच्छता




   

नवी दिल्ली, 04 : स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत केंद्र सरकार मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मीनस(सीएसटी) येथे विशेष स्वच्छता योजना राबवणार आहे.
            पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या देखरेखीत स्वच्छ भारत अभियानाची देशभर सुरूवात करण्यात आली. आता केंद्रीय नगर विकास, सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्रालय तसेच संबंधित राज्य शासनाच्या मदतीने देशातील निवडक १०० वारसा क्षेत्र,आध्यात्मिक आणि सांस्कृतिक स्थळांच्या ठिकाणी विशेष स्वच्छता योजना राबवण्याचा  कार्यक्रम आखण्यात आला आहे. या संदर्भात जाहीर पहिल्या निवडक १० वास्तुंच्या यादीत मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मीनस (सीएसटी) चा समावेश करण्यात आला आहे.
 या १०० ठिकाणांपैकी पहील्या १० ठिकाणांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीत जम्मु आणि काश्मीर मधील वैष्णौ देवी मंदिर पहिल्या क्रमांकावर असून सीएसटी दुस-या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशातील ताजमहल आणि मणिकर्णिका घाट, आंध्र प्रदेशातील तिरूपती मंदिर, पंजाबमधील स्वर्ण मंदिर,राजस्थान मधील अजमेर शरीफ दरगा, तामिळनाडुतील मिनाक्षी मंदीर ,आसाम मधील कामाख्या मंदिर आणि ओडिशातील जगन्नाथ पुरी चा समावेश आहे. या यादीत निवड झालेल्या राज्यातील मुख्य सचिवांसोबत ३१ मे २०१६ रोजी व्हिडीयो कॉन्फरसिंगच्या माध्यमातून चर्चा करण्यात आली आहे. त्यांना दोन आठवडयाच्या आत या विशेष स्वच्छता अभियानाचा आरखडा मागण्यात आला आहे. संबंधित केंद्रीय मंत्रालयांच्या सचिवांनी या अभियानाच्या यशस्वी अमंलबजावणीसाठी राज्यांना सर्वतोपरी तांत्रिक मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. 
सध्या देशातील पहिल्या १० ठिकाणांची यादी तयार झाली असून उर्वरीत ९० ठिकाणांची यादी तयार करण्याचे काम सुरु आहे. पहिल्या यादितील १० ठिकाणांवरील विशेष स्वच्छता योजनेच्या अनुभवाच्या आधारावर उर्वरीत ९० ठिकाणच्या  स्वच्छता योजनेचा कार्यक्रम आखण्यात येणार आहे.                
                                                                            ००००
सूचना : सोबत छायाचित्र जोडली आहेत.



No comments:

Post a Comment