Saturday, 13 August 2016

‘भारत पर्व’ ; पुरण पोळी व पुणेरी पगडी आकर्षण ; महाराष्ट्र अहेड व लोकराज्यला तरूणांचा प्रतिसाद














नवी दिल्ली, १३ : देशाची वैविद्यपूर्ण संस्कृती आणि प्रगतीचे दर्शन घडविणा-याभारत पर्वप्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राचे प्रसिध्द व्यंजन पुरण पोळी आणि मराठीबाणा दर्शविणारी पुणेरी पगडी येथे येणा-यांचे आकर्षण ठरले. राज्याच्या विकासाची व विविध योजनांची माहिती देणारे शासनाचे मुखपत्र महाराष्ट्र अहेड व लोकराज्यला तरूणांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.
            भारत देशाच्या ७० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने येथील राजपथावरील लॉन वर देशाचा गौरपूर्ण इतिहास व वैविद्यपूर्ण संस्कृती दर्शविणा-या भारत पर्व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. १७ राज्यांनी या प्रदर्शनात आपला सहभाग नोंदविला असून पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या दालनांना प्रेक्षकांचा उंदड प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्राचे तीन दालने या ठिकाणी आहेत. पहिल्याच दिवशी जवळपास ३ हजार प्रेक्षकांनी या दालनांना भेट दिली. पुरण पोळी , पुणेरी पगडी प्रेक्षकांचे आकर्षण ठरले तर               राज्य शासनाचे मुखपत्र महाराष्ट्र अहेड आणि लोकराज्य ला तरूणांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. 
         येथे देशाच्या विविध राज्यांच्या खाद्यपदार्थांचे दालन उभारण्यात आले असून महाराष्ट्राच्या खाद्य दालनाला भेट देणा-या खवय्यांसाठी पुरण पोळी महत्वाचे आकर्षण ठरले आहे. या स्टॉलवर पुरण पोळीचा आस्वाद घेणारे, मुळचे उत्तर प्रदेशातील अलाहबादचे आणि दिल्लीत नोकरी करणारे अम्बरीश श्रीवास्तव सांगतात, शिक्षणासाठी पुण्याला असताना मी पुरण पोळीचा आस्वाद घेतला होता. भारत पर्व प्रदर्शात महाराष्ट्राच्या स्टॉलवर दिल्लीत पुरण पोळी खान्याचा आंनद मनाला सुखावून गेला. श्रीवास्त पुढे सांगतात , माझ्यामते  पुरण पोळी ही  देशातील सर्वोतम स्वीट डीश आहे.
     महाराष्ट्र राज्याचा विविध क्षेत्रातील विकास आणि स्वातंत्र्य चळवळीतील योगदान दर्शविणार-या डिजीटल दालनाला भेट देणा-यांची संख्याही मोठी आहे. यात शालेय मुलांचे आकर्षण ठरत आहे, एलइडीवर फेस रिकग्नेशन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून परिधान करण्यात येणारी पुणेरी पगडी.
             दिल्लीला लागूनच असणा-या उत्तरप्रदेशच्या गाजीयाबाद जिल्हयातील कौशांबी येथील ८ वीत शिकणारा माहित गुप्ता म्हणतो, एलइडीवर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पुणेरी पगडी घालून मला खूप आंनद झाला. मी, पहिल्यांदाच असा प्रयोग बघीतला. मला इतिहासात आवड आहे. लोकमान्य टिळक, महादेव गोविंद रानडे यांनी पुणेरी पगडी घालत असल्याचे मी  अभ्यासले आहे. महाराष्ट्र दालनात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पुणेरी पगडी घालण्याचा अनुभव माझ्यासाठी  अविस्मरणीय असल्याचे माहित सांगतो. ब्लुटूथच्या माध्यमातून पुणेरी पगडी परीधान केलेला फोटो माहित ने आपल्या मोबाईलमधे घेतला त्याचाही त्याला खूप आनंद झाला.  
            महाराष्ट्र शासनाच्या विकास कामांची व विविध योजनांची माहिती देणारे शासनाचे मुखपत्र महाराष्ट्र अहेड आणि लोकराज्यला तरूणांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. मुळचा बिहार मधील भागलपूरचा महंमद आफताब आलम, सध्या दिल्लीत स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करीत आहे. आफताब सांगतो, महाराष्ट्र अहेड मधून महाराष्ट्राची इंतभूत माहिती मिळते आणि राज्याच्या विकास कामांची माहिती मिळते त्यामुळे माझ्या प्रमाणेच स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणा-यासांठी हे मासिक खूपच उपयुक्त आहे.     
            दिनांक १८ ऑगस्ट पर्यंत दररोज दुपारी २ ते रात्री ९ वाजे पर्यंतभारत पर्वला भेट देता येणार आहे.                                                        

                                               ०००००   

No comments:

Post a Comment