Friday, 12 August 2016

‘भारत पर्व’ ला सुरुवात ; महाराष्ट्राच्या जडणघडणीचे डिजीटल दर्शन






नवी दिल्ली, १२ : देशाच्या प्रगतीचे दर्शन घडविणा-या ‘भारत पर्व’ या प्रदर्शनास आज नवी दिल्लीत सुरुवात झाली. १७ राज्यांनी या प्रदर्शनात आपला सहभाग नोंदविला आहे. महाराष्ट्राने आपल्या जडण घडणीचे दर्शन या प्रदर्शनात घडविले आहे.
         स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने येथील राजपथावरील लॉन वर दिनांक १२ ते १८ ऑगस्ट या कालावधीत देशाचा गौरपूर्ण इतिहास दर्शविणा-या ‘भारत पर्व’ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उदघाटन झाले. केंद्रीय नगर विकास , माहिती व प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू, पर्यटन व सांस्कृतिक मंत्री डॉ. महेश शर्मा, माहिती व प्रसारण मंत्री राज्यमंत्री राजवर्धन सिंह यावेळी उपस्थित होते.
      विविध हस्तकला, खाद्य पदार्थ आणि विविध क्षेत्रातील उपलब्धी दर्शविणारी राज्यांची दालने याठिकाणी आहेत. महाराष्ट्राचे तीन दालने या ठिकाणी आहेत. राज्याचा विविध क्षेत्रातील विकास आणि स्वातंत्र्य चळवळीतील योगदान दर्शविणारे डिजीटल दालन लक्ष वेधून घेते. या ठिकाणी ‘मेकइन महाराष्ट्रा’च्या माध्यमातून राज्यात झालेली गुंतवणूक व विकास हे आकर्षक पॅनलच्या माध्यमातून दर्शविण्यात आले आहेत. महात्मा ज्योतीबा फुले,छत्रपती शाहु महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर या समाज सुधारकांचे देश विकासातील योगदान, आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांच्यासह लोकमान्य टिळक आणि स्वातंतत्र्यवीर दामोदर सावरकर यांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान, कला, संस्कृती आदींमध्ये राज्याचे योगदान दर्शविणारे आकर्षक पॅनल येथे आहेत.
                  डिजीटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महाराष्ट्राची सफर
दालनात शिरताच मोठी एलइडी दिसते ‘व्हर्च्युअल टुरीजम’च्या माध्यमातून शिर्डी येथील साई बाबा मंदीर, बीबी का मखबरा,अंजीठा-वेरूळ लेण्या आणि तारकर्ली समुद्र किना-याची सफर येथे भेट देणा-यांना करण्यास मिळते. अन्य एका एलइडीवर ‘फेस रिकग्नेशन तंत्रज्ञाना’च्या माध्यमातून पुणेरी पगडी, महाराष्ट्राचा फेटा परिधान करण्याचा आनंद घेता येतो . विशेष म्हणजे याची छायाचित्रे ब्लूटूथ व वायफायच्या माध्यमातून प्रेक्षकांना आपल्या मोबाईलमध्ये घेण्याची सोय करून देण्यात आली आहे. उभी स्क्रीन उभारून चित्रांची जुळवाजुळव करण्यासाठी लोकमान्य टिळक, छत्रपती शाहू महाराज आदी महा पुरूषांचे चित्र देण्यात आले आहेत. ‘ऑगमेटीक रियॅलीटी’ या तंत्रज्ञानाचा प्रयोग करून राज्यातील ताडोबा अभयारण्यात वाघाला कुरवाळण्याचा अनुभव येथे मिळतो.
           राज्यातील हस्तकला दर्शविणारे दालनही येथे उभारण्यात आले आहे. पैठणी साडया, वारली पेटींग, लाखाच्या बांगडया, कोल्हापूरी चपला आदी वस्तू येथे बघायला मिळते. महाराष्ट्रातील लज्जतदार व्यंजनही येथे येणा-या प्रेक्षकांना चाखता येतात. त्यासाठी महाराष्ट्रीयन खाद्य पदार्थांचे दालन उभारण्यात आले आहे. पुरण पोळी, साबुदाना खिचडी, साबुदाना वडा, पीठल भाकरी, भरली वांगी, वडा पाव आदी मराठमोडी व्यंजन येथे उपलब्ध आहेत. दिनांक १८ ऑगस्ट पर्यंत दररोज दुपारी २ ते रात्री ९ वाजे पर्यंत ‘भारत पर्व’ ला भेट देता येणार आहे.
         पर्यटन मंत्री डॉ. महेश शर्मांची महाराष्ट्र दालनास भेट ; लोकराज्य अंकाचे कौतुक
केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्री डॉ. महेश शर्मा यांनी भारत पर्व चे उदघाटन झाल्यानंतर महाराष्ट्र दालनास भेट दिली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र दालनात मांडण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्याचे मुखपत्र लोकराज्य अंकाच्या स्टॉलची आवर्जून पाहणी केली. लोकराज्य आणि महाराष्ट्र अहेड या अंकाच्या मांडणीचे त्यांनी कौतुक केले. डॉ. शर्मा यांना लोकराज्य व महाराष्ट्र अंक भेट स्वरूपात देण्यात आले.
                              ०००


No comments:

Post a Comment