Wednesday, 17 August 2016

भारत पर्व : देश-विदेशातील तरुणांना ‘व्हिजीट महाराष्ट्र’ चे आकर्षण












नवी दिल्ली, 17:  महाराष्ट्र दालनास भेट  दिल्यावर देश-विदेशातील तरुणांनी राज्यातील पर्यटन स्थळांना  भेट देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या निमित्ताने राज्य शासनाने घोषित केलेल्या व्हिजीट महाराष्ट्र-2017 ला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून आले.   
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने देशाचा गौरपूर्ण इतिहास व वैविद्यपूर्ण संस्कृती दर्शविणा-या भारत पर्वप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. आज पारशी नववर्ष दिनामुळे शाळा, महाविद्यालय, खाजगी व सरकारी कार्यालयांना सुट्टी असल्याने दिल्लीकर आणि दिल्लीस येणा-या  पर्यटकांची मोठी गर्दी भारत पर्व प्रदर्शनात बघायला मिळाली. विविध राज्यांनी या प्रदर्शनात आपला सहभाग नोंदविला आहे. प्रदर्शनाचा आजचा पाचवा दिवस असून इथे भेट देणा-या देश–विदेशातील तरुणांनी  महाराष्ट्र दालनात एकच गर्दी केली. इथे डिजीटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राज्याच्या विकासाबाबत, पर्यटन स्थळांबाबत आणि राज्यातील महापुरुषांचे  स्वातंत्र्य चळवळ व देश विकासातील योगदानाचे उत्तम सादरीकरण करण्यात आले आहे. आणि हे दालन तंत्रज्ञान युगात वावरणा-या  देश विदेशातील तरुण पिढीचे आकर्षण ठरत आहे.
अमेरिकेतील शिकागो शहरात राहणारा सॅम आणि स्पेन मधील त्याचा मित्र ॲलेक्स सध्या भारत भेटीवर असून आज त्यांनी भारत पर्व मध्ये महाराष्ट्र दालनास भेट दिली. दालनाबद्दल सांगताना सॅम सांगतो, या ठिकाणी तंत्रज्ञानाचा प्रयोग करुन दर्शविण्यात आलेला महाराष्ट्र मला खूप आवडला. एलइडी वॉल वर दिसणारा ताडोबा जंगलातील वाघ आणि त्याच्या सोबत सेल्फी घेण्याचा अनुभव फारच छान  होता.  तर ॲलेक्स सांगतो, इथे ठेवण्यात आलेला पझल गेम मी खेळलो आणि लोकमान्य टिळक या महापुरुषाचे चित्र यशस्वीरित्या तयार केले. पुणेरी पगडी आणि फेटा परिधान केला. येथील विविध स्क्रीनवर दर्शविण्यात आलेली महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांविषयची माहिती अप्रतिम आहे. ॲलेक्स आणि सॅम यांनी या दालनात महाराष्ट्रा विषयी उत्तम माहिती मिळाल्याचे सांगून आम्ही लवकरच महाराष्ट्राला भेट देणार असल्याचे सांगितले. या दोघांना महाराष्ट्रातील प्रसिध्द लोणावळा चिक्की आणि व्हिजीट महाराष्ट्र ची कॅप भेट स्वरुपात देण्यात आली.  
दिल्ली विद्यापीठाच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या चमुने महाराष्ट्र दालनास भेट दिली. त्यांना हे दालन फार आवडले. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत असलेला निरज कुमार भारत सांगतो, व्हर्च्यअल टुरीच्या माध्यमातून  शिर्डी  येथील साई बाबा मंदीर, बीबी का बरा,अंजीठा-वेरूळ लेण्या आणि ताकर्ली समुद्र किना-याची सफर ा दालनात करायला मिळाली. महात्मा फुले, छत्रपती शाहु महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे देशाच्या सामाजिक सुधारणेतील योगदान तसेच आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत योगदानबद्दल उपयुक्त माहिती मिळाल्याचे तो सांगतो. याआधी आपण वर्धा येथील सेवाग्राम आश्रमला भेट दिली असून महाराष्ट्र दालनातील प्रदर्शनामुळे मी प्रभावित झालो आहे व लवकरच महाराष्ट्राला भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दिल्ली विद्यापीठातून राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत असलेली  प्रतिभा सेठ सांगते, एलइडीवरफेस रिकग्नेशन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पुणेरी पगडी, महाराष्ट्राचा फेटा परिधान करण्याचा आनंद घेता आला. विशेष म्हणजे, याची छायाचित्रे ब्लूटूथ वायफायच्या माध्यमातून मला व माझ्या मैत्रिणींना मोबाईलमध्ये घेण्याची  इथे सोय करून देण्यात आली त्यामुळे आंनदात आणखी भर पडली. ऑगमेटीक रियॅलीटी या तंत्रज्ञानाचा प्रयोग करून राज्यातील ताडोबा अभयारण्यात वाघाला कुरवाळण्याचा अनुभवही मजेशीर होता असे तीने सांगितले.आम्हा सर्व मैत्रिणींना महाराष्ट्र दालनातील प्रदर्शन खूप आवडले असून आम्ही सर्व महाराष्ट्राला लवकरच भेट देणार असल्याचे तीने सांगितले. 
 यावर्षी जानेवारी महिन्यात महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या वतीने दिल्ली हाट येथे आयोजित महाजत्रा प्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिजीट महाराष्ट्र-2017 ची घोषणा केली. आणि राज्यातील गड, किल्ले, समुद्र किनारे, लोकसंस्कृती बघण्यासाठी महाराष्ट्रास भेट द्या अशा शब्दात दिल्लीकर, देश व विदेशातील पर्यटकांना  खुले निमंत्रण दिले होते. त्यास भारत पर्व मधे  देश विदेशातील पर्यटकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. 

No comments:

Post a Comment