नवी दिल्ली दि. 4 : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्यासाठी मुंबईतील इंदू मिलची १२ एकर जमीन महाराष्ट्र शासनाला हस्तांरीत करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी रात्री पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार नियम आणि अटींच्या अधिन राहून राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळ आपल्या मालकीची इंदू मिलची १२ एकर जमीन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाला हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुंबईतील चैत्यभूमी या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निर्वाणस्थळा शेजारी राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाची इंदू मिलची जागा आहे. या ठिकाणी डॉ.आंबेडकरांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्याची मागणी मोठया प्रमाणात होत होती. महाराष्ट्र शासनाने तसा प्रस्ताव केंद्राकडे पाठवून त्याचा यशस्वी पाठपुरावा केला आणि केंद्राने त्यास मान्यता दिली. वस्त्रोद्योग सुधारणा कायदा १९९५ च्या ‘कलम ११अ’ अंतर्गत महाराष्ट्र शासन या जागेच्या मोबदल्यात आवश्यक रक्कम राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाला अदा करेल असा निर्णयही घेण्यात आला होता. यासंदर्भात भारत सरकार, राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळ आणि महाराष्ट्र शासन यांच्यात करारही झाला आहे.
000000
No comments:
Post a Comment