नवी दिल्ली, 16: महाराष्ट्रातील क्रांतीकारक, समाजसुधारक आणि थोर महापुरुषांची माहिती, तसेच राज्याने विविध क्षेत्रात केलेला विकास महाराष्ट्र दालनात मांडण्यात आला असून भारत पर्वची अपेक्षित संकल्पनाच येथे प्रत्यक्ष बघायला मिळाली अशी भावना संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी व्यक्त केली.
डॉ.भामरे यांनी आज “भारत पर्व” प्रदर्शनात महाराष्ट्र दालनास भेट दिली. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे दिल्लीतील प्रतिनिधी सुनिल कुगिंरी यांनी डॉ. भामरे यांचे स्वागत केले. महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यावेळी उपस्थित होते.
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या वतीने येथील राजपथ लॉनवर “भारत पर्व”चे आयोजन करण्यात आले.या प्रदर्शनात महाराष्ट्र शासनाच्या वतीने तीन दालने उभारण्यात आली आहेत. महाराष्ट्राच्या प्रगतीचा आढावा घेणारे आणि देश विकासात राज्याचे योगदान दर्शविणा-या डिजीटल दालनास डॉ. भामरे यांनी भेट दिली. या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमाचा उपयोग करुन घडविण्यात आलेले महाराष्ट्राचे दर्शन कौतुकास्पद असल्याचे गौरोद्गार त्यांनी यावेळी काढले. तसेच राज्यातील क्रांतीकारक, समाजसुधारक आणि थोर महापुरुषांची माहिती आकर्षक पध्दतीने येथे मांडण्यात आली आहे. यामुळे दिल्लीसह उत्तर भारतातील जनतेला महाराष्ट्राती थोर पुरुषांची माहिती मिळते. देशातील विविध राज्यांचा गौरवपूर्ण इतिहास व महापुरुषांचे योगदान सर्वसामान्यां पर्यंत पोहचविण्याचा उद्देश भारत पर्व या प्रदर्शनाचा असून महाराष्ट्र दालनात ही संकल्पना प्रत्यक्षात मांडण्यात आली आहे. याबद्दल त्यांनी संयोजकांचे अभिनंदन केले.
येथे उभारण्यात आलेल्या महाराष्ट्रातील हस्तकला दालनासही डॉ.भामरे यांनी भेट दिली. राज्यातील लघु उद्योजकांच्या पैठणी साडया,वारली पेटींग, लाखाच्या बांगडया, कोल्हापूरी चपला आदी वस्तू येथे प्रदर्शनास व विक्रीस मांडण्यात आल्या आहेत. डॉ. भामरे यांनी या दालनातील प्रत्येक स्टॉल ला भेट देऊन लघु उद्योजकांशी संवाद साधला व त्यांची आस्थेने चौकशी केली.
महाराष्ट्र अहेड व लोकराज्य अंकाचे कौतुक
संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी आज महाराष्ट्र दालनातील महाराष्ट्र अहेड व लोकराज्य अंकाच्या स्टॉल ला भेट दिली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र दालनात मांडण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्याचे मुखपत्र लोकराज्य अंकाच्या स्टॉलची आवर्जून पाहणी केली. महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी डॉ. भामरे यांना महाराष्ट्र अहेड व लोकराज्य अंक भेट स्वरूपात दिले. डॉ.भामरे यांनी यावेळी महाराष्ट्र फूड स्टॉल ला भेट देऊन मिसळपावचा आस्वाद घेतला.
No comments:
Post a Comment