Friday, 30 September 2016

महाराष्ट्राची सुरक्षा व्यवस्था चोख-मुख्यमंत्री फडणवीस












                                                       
नवी दिल्ली, 30 :  भारतीय सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह महाराष्ट्रातील सुरक्षा व्यवस्था सज्ज असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह यांना दिली.
महाराष्ट्राला दुष्काळाबाबत केंद्राकडून मिळालेल्या भक्कम आर्थिक मदतीबाबतही त्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांचे आभार मानले.
            मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज नार्थ ब्लॉक येथे राजनाथ सिंह यांची भेट घेतली. यावेळी केंद्रीय गृह राज्य मंत्री श्री  किरण रिजिजु  आणि हंसराज अहिर उपस्थित होते.
            याबैठकीनंतर प्रसार माध्यमांना माहिती देतांना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भारतीय सैन्याने पाक व्याप्त काश्मिर भागात सर्जिकल स्ट्राईकद्वारे दहशतवाद्यांचे अड्डे उधळून लावल्याच्या पार्श्वभूमीवर तणावाचे वातावरण पाहता महाराष्ट्र शासनाने सुरक्षेसंबंधी सज्जता ठेवली आहे. मुंबईसह राज्यातील सर्व भागात कडेकोड सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आल्याची माहिती श्री राजनाथ सिंह यांना दिली.      
  
दुष्काळासाठी मिळालेल्या केंद्रीय निधीबाबत मानले आभार
महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थतीसाठी केंद्राकडून देण्यात आलेल्या 1 हजार 269  कोटीच्या मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी श्री. राजनाथ सिंह यांचे आभार मानले, याचा फायदा राज्यातील दुष्काळाची झळ बसलेल्या शेतक-यांना होणार असल्याचे ते म्हणाले.
महाराष्ट्र शासनाने राज्यातील दुष्काळाबाबत दिलेली पुरवणी मागणी केंद्राने स्वीकारल्या असून देशाच्या इतिहासात राज्य सरकारच्या पुरवण्या मागण्या स्वीकारल्याची पहिलीच घटना असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील जवानाला सुरक्षित भारतात आणावे
पकव्याप्त काश्मिरमध्ये झालेल्या सर्जिकल स्ट्राईक नंतर सिमेवर झालेल्या चकमकीत महाराष्ट्रातील धुळे जिल्हयातील नंदू चव्हाण हे सैनिक अनावधानाने पाकीस्तानच्या हद्दीत गेले आहे. त्यांना भारतात सुरक्षित परत आणण्यात यावे, अशी विनंती मुख्यमंत्री फडणवीस यांनी राजनाथ सिंह यांना केली. 


No comments:

Post a Comment