Friday 30 September 2016

पुणे शहर व सिंधुदूर्ग जिल्ह्यास राष्ट्रीय स्वच्छता पुरस्कार




 नवी दिल्ली, 30 : पुणे शहरास स्वच्छ शहर तर सिंधुदूर्ग जिल्ह्यास स्वच्छ जिल्हा या राष्ट्रीय स्वच्छता पुरस्काराने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्वच्छ भारत संमेलनात हा गौरव करण्यात आला.
विज्ञान भवन येथे इण्डोसन या राष्ट्रीय स्वच्छता संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी देशभरातील सर्वाधिक स्वच्छ शहरे, जिल्हा परिषद, पर्वतिय शहरे, शाळा, पर्यटन स्थळांना पुरस्कृत करण्यात आले यावेळी केंद्रीय नगर विकास मंत्री एम. वैंकय्या नायडू, केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्री नरेंद्र सिंग तोमर, केंद्रीय नगर विकास राज्यमंत्री राव इंद्रजित सिंग, केंद्रीय पेयजल व स्वच्छता राज्यमंत्री रमेश चंदप्पा जीगाजिनागी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रविणसिंह परदेशी, नगर विकास सचिव मनीषा म्हैसकर या संमेलनास उपस्थित होते. तसेच देशातील विविधि राज्यांचे मुख्यमंत्री, लोकप्रतिनिधी, सचिव, महानगरपालिकांचे आयुक्त आदी उपस्थित होते.
.
 पुणे महानगरपालिकेने राबविलेल्या विशेष प्रकल्पांतर्गत घराघरातून कचरा उचलने, त्याचे नियोजन करणे, कच-यापासून खत निर्मित करणे. यासह कचरा उचलणा-या कामगांराना अद्यावत साधन सामुग्री प्रदान करणे. केंद्राने स्वच्छता अभियानातंर्गत ठरविलेल्या नियमांचे पालन केल्यामुळे पुणे शहराला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुण्याचे महापौर प्रशांत जगताप, पुणे महानगर पालिका आयुक्त कुणाल कुमार आणि शहर स्वच्छ करणा-या महिला कामगारांच्या प्रतिनिधी श्रीमती राधाबाई सावंत यानी स्वीकारला.
किनार पट्टीवरील जिल्हयांमध्ये सर्वाधिक स्वच्छ शहर या गटात सिंधुदूर्ग जिल्ह्याला स्वच्छ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगांवकर, मुख्यकार्यकारी अधिकारी शेखर सिंग यांनी स्वीकारला. वेगवेगळ्या पातळीवर झालेल्या स्पर्धांनंतर यांची निवड झाली असून आज हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
स्वच्छतेचे स्वच्छाग्रही बना
      पंतप्रधानांचे आवाहन

ज्याप्रमाणे भारत स्वतंत्र करण्यासाठी सत्याग्रह करण्यात आले. त्याच प्रमाणे भारताला स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी स्वच्छाग्रही बना, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संमेलनात केले.
स्वच्छता सर्वांना आवडते, मात्र घरात पाळली जाणारी स्वच्छता सार्वजनिक ठिकाणी पाळली जात नाही. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता पाळणे सुरू झाल्यास संपूर्ण देश स्वच्छ व्हायला वेळ लागणार नाही.
राष्ट्रीय प्रसार माध्यमांमध्ये दिवसभरात एकदा तरी स्वच्छता समाचार सारखे उपक्रम सुरू करावेत. ज्यामुळे जनतेमध्ये अधिक जागृकता निर्माण होईल. राज्या-राज्यात विविध स्तरावर स्वच्छतेबाबतच्या स्पर्धा घेऊन प्रोत्साहनपर पुरस्कार द्यावे. युवकांना स्वच्छता अभियानामधून रोजगार निर्मिती कशी करता येईल याबाबत अभ्यास करावा. घन कच-यापासून अर्थकारण करण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

श्री.वैंकय्या नायडू यांच्या भाषणात महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील साईखेडा येथील संगीता आव्हळे यांचा उल्लेख झाला. त्यांनी मंगळसूत्र विकून शौचालय बांधले होते. त्यांच्या कामाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली. यासह हगणदारी मूक्त करण्यामध्ये महाराष्ट्र प्रशंसनीय कामगिरी करीत असल्याचे आणि पुढील काही काळात महाराष्ट्र हगणदारी मुक्त होईल असा विश्वास, श्री नायडू यांनी यावेळी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment