Saturday, 19 November 2016

राष्ट्रीय सेवा योजनेत महाराष्ट्राचा गौरव
















नवी दिल्ली, 19 : महाराष्ट्रातील राष्ट्रीय सेवा योजनेचे  एक कार्यक्रम समन्वयक ,एक कार्यक्रम अधिकारी यांच्यासह दोन स्वयंसेवकांचा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते इंदिरा गांधी राष्ट्रीय सेवा योजना पुरस्काराने गौरव करण्यात आला.
            राष्ट्रपती भवनाच्या दरबारहॉल मधे आज केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत इंदिरा गांधी राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार २०१५-१६ या वर्षाच्या पुरस्काराचे वितरण आज करण्यात आले. एनएसएसच्या माध्यमातून उत्तम कार्य करणा-या देशभरातील विविध  विद्यापीठांच्या ४ कार्यक्रम समन्वयकांना, १० महाविद्यालयांच्या कार्यक्रम अधिका-यांना आणि ३० महाविद्यालयांच्या समन्वयकांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री  विजय गोयल यांच्यासह  मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या  राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम समन्वयक डॉ. भाऊराव दायदर यांना उल्लेखनीय कार्यासाठी  या पुरस्काराने गौरविण्यात आले.  नांदेड येथील शारदा भवन शिक्षा समाज यशवंत महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. शिवाजीराव बोकाडे यांना यावेळी सन्मानीत करण्यात आले. कोल्हापूर येथील विवेकानंद महाविद्यालयाची एनएसएस स्वयंसेविका शानेदिवान सोनिया राजेखान आणि सोलापूर येथील डी.बी.एफ. दयानंद कला व विज्ञान महाविद्यालयाचा एनएसएस स्वयंसेवक शेखआफताब अनवर यांना उल्लेखनीय योगदानासाठी  पुरस्काराने गौरविण्यात आले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम समन्वयक डॉ. भाऊराव दायदर यांनी एनएसएस स्वयंसेवकांचा व्यक्तीमत्व विकास घडविण्यात आणि सामुदायिक सेवेत महत्वपूर्ण योगदान दिले आहे. श्री. करपे यांनी  ६९२ वृक्षारोपणाचे कार्यक्रम आयोजित करून ४३ हजार८४० वृक्षांची लागवड केली. त्यांनी ४३ हजार ८४० युनीट रक्तदान  करण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आलेला एचआयव्ही एडस जागृकता कार्यक्रम आदीं महत्वपूर्ण योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. १ लाख रूपये रोख, पदक आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
नांदेड येथील शारदा भवन शिक्षा समाज यशवंत महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. शिवाजीराव बोकाडे यांनी यांनी  ६ वृक्षारोपणाचे कार्यक्रम आयोजित करून १५४० वृक्षांची लागवड केली. त्यांच्या मार्गदर्शनात ३०० युनीट रक्त संकलीत करण्यात आले. महत्वपूर्ण योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.  रोख राशी , पदक आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
कोल्हापूर येथील विवेकानंद महाविद्यालयाची एनएसएस स्वयंसेविका शानेदिवान सोनिया राजेखान आणि सोलापूर येथील डी.बी.एफ. दयानंद कला व विज्ञान महाविद्यालयाचा एनएसएस स्वयंसेवक शेखआफताब अनवर यांना प्रामाणिक व  सक्रीय सहभागासाठी उत्कृष्ट एनएसएस स्वयंसेविका व स्वयंसेवकाच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात  प्रत्येकी ५० हजार रूपये रोख, पदक आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
                                                                       00000




No comments:

Post a Comment