Monday 21 November 2016

आयआयएमसी मराठीतून अभ्यासक्रम सुरू करणार- के.जी. सुरेश

 











नवी दिल्ली, 21 : भारतीय जनसंज्ञापन संस्था (IIMC) येत्या शैक्षणिक वर्षापासून अमरावती येथील संकुलात मराठीतून जनसंज्ञापनाचा अभ्यासक्रम सुरू करणार असल्याची माहिती संस्थेचे महासंचालक के.जी.सुरेश यांनी दिली.
            राज्य अधिस्वीकृती समितीची सातवी बैठक दिल्लीत सुरू असून समितीच्या सदस्यांनी आज आयआयएमसीला भेट दिली यावेळी के.जी. सुरेश यांनी ही माहिती दिली. यावेळी राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदूनाथ जोशी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक  देवेंद्र भुजबळ, आयआयएमसीचे अतिरिक्त महासंचालक  मयंककुमार अग्रवाल, प्रा.विजय परमार, सहयोगी प्राध्यापक डॉ.सुरभी दहिया उपस्थित होत्या.
            के.जी.सुरेश म्हणाले, आयआयएमसी चे देशात एकूण 6 संकुल असून महाराष्ट्रात  अमरावती येथे संकुल उघडण्यात आलेली आहे. संस्थेच्या इतिहासात प्रथमच मराठी भाषेतून जनसंज्ञापनाचा अभ्यासक्रम शिकविण्यात येणार आहे. शैक्षणिक वर्ष 2017-18 पासून या अभ्यासक्रम सुरु होणार आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाचा मोठ्याप्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी आणि माहिती  विभागाच्या अधिका-यांनी या संदर्भात जनजागृतिसाठी सहयोग करावा असे आवाहन केले.
बडनेरा येथे 16 एकर जागा
आयआयएमसी अमरावतीसाठी महाराष्ट्र शासनाने बडनेरा येथे 16 एकर जागा उपलब्ध करून दिली असून त्याबद्दल के.जी.सुरेश यांनी शासनाचे आभार मानले.
सध्या संत गाडगेबाबा महाराज अमरावती विद्यापीठ येथे आयआयएमसीची शाखा सुरू आहे.
मुंबई येथे नॅशनल सेंटर फॉर एक्सलन्स उभारणार

प्रसार माध्यमातील होत असलेले विविध आधुनिक बदल व प्रशिक्षणाची मागणी पहाता येत्या काळात मुंबई आयआयएमसीद्वारा नॅशनल सेंटर फॉर एक्सलन्स संस्था उभारण्यात येणार असल्याची माहिती श्री.सुरेश यांनी दिली. नवमाध्यमांचे प्रशिक्षण देण्यासाठी आयआयएमसीद्वारे ही संस्था उभारण्यात येणार असून महाराष्ट्र शासनाकडे नवी मुंबई येथे 25 एकर जागेची मागणी करण्यात आलेली आहे. 

No comments:

Post a Comment