Sunday, 20 November 2016

राज्य अधिस्वीकृती समितीच्या सदस्यांची महाराष्ट्र दालनास भेट









नवी दिल्ली, 20 : महाराष्ट्र राज्य अधिस्वीकृती समितीच्या सदस्यांनी आज भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळयातील ‘डिजीटल महाराष्ट्र दालना’स भेट दिली.
राज्य अधिस्वीकृती समितीची बैठक नवी दिल्ली येथे सुरु असून समितीच्या सदस्यांनी येथील प्रगती मैदान येथे सुरु असलेल्या ३६ व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळयात महाराष्ट्र दालनास भेट दिली. महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक विजय कपाटे, निवासी व्यवस्थापक अमरज्योत अरोरा, नाशिक-औरंगाबाद विभागाच्या व्यवस्थापक अलका मांजरेकर यांनी राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदूनाथ जोशी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (माहिती)(वृत्त व जनसंपर्क) देवेंद्र भुजबळ, महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांच्यासह समितीच्या सदस्यांचे स्वागत केले.
महाराष्ट्र दालनामध्ये ग्रामपंचायतींना इंटरनेटच्या माध्यमातून जोडणारी ई-चावडी, भूमापनासाठी वापरण्यात येणारी ई-मोजणी, राज्याची वनसंपदा व उद्योग क्षेत्रासह दळणवळण क्षेत्रातील प्रगती दर्शविणारी आकर्षक मांडणी करण्यात आली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात झालेली परदेशी गुंतवणूक व या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेला रोजगार हे डिजीटल स्वरुपात ठळकपणे दर्शविण्यात आले आहे. शासकीय कामकाज पारदर्शी व जलद गतीने होण्यासाठी राज्य सरकार राबवित असलेली “आपले सरकार” ही संकल्पना तसेच, राज्यातील स्मार्ट सिटी प्रकल्पाची माहिती डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर करुन मांडण्यात आली आहे. या मांडणीमुळे महाराष्ट्र दालनास भेट देणा-या देश विदेशातील ग्राहक व जनतेला डिजीटल महाराष्ट्राची ओळख होणार असल्याच्या भावना राज्य अधिस्वीकृती समितीच्या सदस्यांनी व्यक्त केल्या .
यावेळी महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या नाशिक विभागाचे सहायक व्यवस्थापक प्रदीप सावळे, मुंबई मुख्यालयातील सहायक व्यवस्थापक गजानन जळगावकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्याच्या विविध भागातील हस्तकला आणि लघु उद्योजकांचे ७० स्टॉल्स येथे विक्री व प्रदर्शनासाठी लावण्यात आली आहेत. या दालनात राज्यातील १६० हस्तकलाकार व लघुउद्योजक सहभागी झाले आहेत. दिनांक 14 ते 27 नोव्हेंबर 2016 या कालावधीत सकाळी 9.30 ते सायंकाळी 5.30 यावेळेत सर्वसामान्य जनतेसाठी मेळावा खुला आहे.

No comments:

Post a Comment