Monday, 7 November 2016

सौंदर्य प्रसाधने कायद्यात द्रव्यदंडाची तरतूद करू : जे.पी. नड्डा












नवी दिल्ली दि. 7: औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्यात द्रव्यदंडाची तरतूद करण्याबाबत कायद्यात सुधारणा करण्यात येईल, अशी ग्वाही केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री  जे.पी. नड्डा यांनी आज अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांना दिली.
            निर्माण भवन येथे आज केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांची भेट श्री बापट यांनी घेतली. यावेळी अन्न व औषध विषयक बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीस वैद्यकिय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव मेघा गाडगीळ, अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, केंद्रीय आरोग्य विभागाचे अतिरीक्त सचिव के.बी. अग्रवाल, सहसचिव के.एल. शर्मा, डी.जी. सी. आयचे  जी.एन. सिंग, एफ.एस.आय.आय. सी. चे पवन कुमार उपस्थित होते.
औषधी व सौंदर्य प्रसाधने कायद्यात द्रव्यदंडाची तरतूद नाही. त्यामुळे किरकोळ उल्लघनाबाबत प्रत्येक वेळी न्यायालयात खटले दाखल केले जातात त्यामुळे मनुष्यबळाचा व्यय होतो यासाठी या कायदयात बदल करून द्रव्यदंडाची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी श्री गिरीश बापट यांनी केली. ही मागणी अत्यंत रास्त आहे त्यामुळे लवकरच औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्यात द्रव्यदंडाची तरतूद करण्याबाबत पाऊले उचलली जातील अशी, ग्वाही केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी बैठकीत दिली.
औषधी मोबईल व्हॅनबाबात सकारात्मक चर्चा
ग्रमीण भागात गरजूंना वेळेत औषधी मिळावीत यासाठी  ‘औषधी मोबाईल व्हॅन सुरू करण्यासाठी केंद्र शासन सकारात्मक विचार करेल असे केंद्रीय मंत्री जे.पी.नड्डा यांनी या बैठकीत स्पष्ट केले. मोबाईल व्हॅन ची संकल्पना उत्तम असून याबाबत पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना श्री नड्डा यांनी अधिका-यांना दिल्या.
पिण्याच्या पाण्याबाबत भारतीय गुणवत्ता प्रमाणक हवे
सध्या बाजारात भारतीय प्रमाणक नसलेले पिण्याचे पाणी विकले जाते. अशा विक्रीवर नियंत्रण आणवे. तसेच, ज्या कंपन्या असे पाणी विकतात त्यांना भारतीय गुणवत्ता प्रमाणक घेण्याबाबत सक्ती करण्यात यावी, अशी मागणी  श्री बापट यांनी यावेळी केली. या मागणीबाबतही केंद्र शासन गांभीर्याने विचार करेल, असे श्री नड्डा यांनी बैठकीत स्पष्ट केले.
अमृत फार्मसीमहाराष्ट्रात सुरू करावी: जे.पी नड्डा
या बैठकीत केंद्रीय कुटुंब व आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा यांनी आज अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांना महाराष्ट्रात अमृत फार्मसी सेवा करावी, असे सूचविले. राज्य शासन याबाबत लवकरच निर्णय घेऊन अमृत फार्मसी ची साखळी राज्यात सुरू करणार असल्याचे आश्वासन श्री बापट यांनी श्री नड्डा यांना दिले.

केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाच्यावतीने अमृत फार्मसी किरकोळ औषध विक्री दुकानांच्या माध्यमातून कर्करोग आणि ह्दय व रक्तवाहिन्यासंबंधी 202 रोगांवरील औषधी या बाजार दरापेक्षा 60 ते 90 टक्के सवलतीच्या दरात विकली जातात. यासह अन्य महत्वपुर्ण विषयांवरही यावेळी चर्चा करण्यात आली. 

No comments:

Post a Comment