Tuesday, 8 November 2016

भारतासह आशियाखंडाची गौरवशाली परंपरा जपेन- डॉ. अनिरूध्द राजपूत



नवी दिल्ली दि. 08 : आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत देशाच्या असलेल्या उत्तम प्रतिमेमुळे माझी संयुक्त राष्ट्र संघाच्या आंतरराष्ट्रीय विधी आयोगावर(ILC)  बहुमताने निवड झाली आहे. विधी आयोगाचा सदस्य म्हणून येत्या काळात जागतिक स्तरावर भारतासह आशियाखंडाची गौरवशाली पंरपरा जपणार असल्याच्या भावना डॉ. अनिरूध्द राजपूत यांनी व्यक्त केल्या.  
महाराष्ट्राचे सुपूत्र डॉ. अनिरूध्द राजपूत यांची नुकतीच संयुक्त राष्ट्र संघाच्या आंतरराष्ट्रीय विधी आयोगावर बहुमताने  निवड झाली आहे. डॉ. राजपूत यांच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र परिचय केंद्रामध्ये गौरव समारंभ आयोजित करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमात शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार शिवाजीराव अढळराव पाटील यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन डॉ. राजपूत यांचा सत्कार करण्यात आला. परिचय केंद्राचे उपसंचालक यांनी यावेळी डॉ.राजपूत यांच्या आई ॲड. वसुंधरा राजपूत आणि वडील डॉ.धनंजय राजपूत, खासदार शिवाजीराव अढळराव पाटील, पीटीआय वृत्तसंस्थेचे  वरिष्ठ संपादक विजय सातोकर, दै. महाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ सहयोगी संपादक सुनिल चावके यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
   डॉ. राजपूत सत्काराला उत्तर देताना म्हणाले, भारत देशाची जागतिक स्तरावर असलेली उत्तम प्रतिमा आणि परराष्ट्र मंत्रालयाने या निवडीसाठी घेतलेली प्रंचड मेहनत यामुळेच संयुक्त राष्ट्र संघाच्या  विधी आयोगावर माझी आाशियाखंडातून भारताचा प्रतिनिधी म्हणून बहुमताने निवड झाली. भारताच्या इतिहासात हा बहुमान मिळवून देण्याची संधी मला मिळाली त्याचा मला अभिमान असल्याचे ते म्हणाले. ही निवड प्रक्रिया अंत्यत मानाची आणि तितकीच कठीण असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकीच्या प्रचारासाठी दिवसाला १९ बैठकांमध्ये सहभाग घेऊन त्यांनी जगातील एकूण १२० देशांमध्ये प्रचार केला. संयुक्त राष्ट्र संघाच्या एकूणू १९३ सदस्य देशांपैकी जगाच्या ५ विभागांतून ३४ सदस्यांची निवड करण्यात येते. आशियाखंडातून निवड झालेल्या ७ सदस्यांपैकी डॉ. राजपूत यांना पहील्या क्रमांकाचे मत मिळाले असूत विधी आयोगाच्या इतिहासात ते सर्वात कमी वयाचे(वय ३३ वर्ष) सदस्य ठरले आहेत. 
या निवडीमुळे आपण जागतिक स्तरावर हवामान बदलासंबंधी कायदा निर्माण करणे, पारंपारीक कायदे परिभाषीत करणे आणि विविध समस्यांवर नेमण्यात आलेल्या लवादाबाबतच्या प्रक्रियेचे नियम तयार करण्यावर भर देणार असल्याचे डॉ. राजपूत म्हणाले. त्यांनी यावेळी आंतरराष्ट्रीय विधी आयोगाची भूमिका,कार्य,नियम आणि कायदे यासंबंधी सवीस्तर माहिती दिली. उपस्थित पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची डॉ. राजपूत यांनी दिलखुलास उत्तर दिली.
                               परिचय केंद्रातील सन्मान स्मृतीत जपेन : डॉ. राजपूत
आंतरराष्ट्रीय विधी आयोगावरील निवडीमुळे सर्वस्तरांतून  माझे अभिनंदन व कौतुक झाले पण महाराष्ट्र परिचय केंद्राने आयोजित केलेला गौरव समारंभ म्हणजे आपल्या माणसांनी थोपटलेली पाठ आहे. त्यामुळे आपल्या माणसांनी दिल्लीत केलेला माझा सत्कार मी कायम स्मृतीत जपेन अशा भावना डॉ. राजपूत यांनी यावेळी व्यक्त केल्या.
                 अनिरुध्दची निवड जगाच्या कल्याणासाठी झालेला राज्याभिषेक
                                                                                                            ॲड. वसुंधरा राजपूत
या प्रसंगी बोलताना डॉ. अनिरूध्द राजपूत यांच्या आई ॲड.वसुंधरा राजपूत यांनी डॉ. राजपूत यांची निवड ही जगाच्या कल्याणासाठी झालेला राज्याभिषेक आहे अशा शब्दात  केली. जुन्नर मध्ये शाळा शिकत असताना शिवनेरीच्या पायथ्यापासून या गडाकडे पाहून मी जीजाऊ प्रमाणे बाळ घडविण्याचा प्रण केला होता. त्यासाठी अनिरूध्दच्या जन्मानंतर त्याला सकारात्मक वातावरण दिले त्याच्या आवडी निवडी जपल्या त्याला गती असलेल्या विषयांमध्ये प्रोत्साहन दिले . आज या प्रयत्नांना फळ आले असून मातृभूमी प्रमाणे डॉ. अनिरूध्द यांनी जगासाठी कार्यकरण्यासाठी त्यांची निवड झाली असल्याचे त्या म्हणाल्या.

परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. खासदार शिवाजीराव अढळराव पाटील, पीटीआय वृत्तसंस्थेचे  वरिष्ठ संपादक विजय सातोकर यांनी यावेळी आपले विचार मांडले. उपसंपादक रितेश भुयार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले. 
                                 0000000


No comments:

Post a Comment