Wednesday, 9 November 2016

कोल्हापूर विधी सेवा प्राधिकरण राज्यात प्रथम



                                                                 
नवी दिल्ली दि. 08 : प्रभावी विधी सेवा पुरविल्याबद्दल महाराष्ट्रातून कोल्हापूर विधी सेवा प्राधिकरण राज्यात अव्वल ठरले आहे. उत्तम शासकीय यंत्रणा आणि लोकांचा सक्रीय सहभाग यामुळेच कोल्हापूर विधी सेवा प्राधिकरणाची महाराष्ट्रातून निवड झाल्याच्या भावना कोल्हापूर विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधिश उमेशचंद्र मोरे यांनी महाराष्ट्र परिचय केंद्रात व्यक्त केल्या.
        उत्तम विधि सेवा पुरविण्यासाठी कोल्हापूर विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश राजेंद्र अवचट आणि सचिव तथा जिल्हा न्यायाधिश उमेशचंद्र मोरे यांना भारताच्या सरन्यायाधिशांच्या हस्ते सन्मानीत करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित सत्कार समारंभात श्री. मोरे बोलत होते. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी  न्या. राजेंद्र अवचट आणि न्या. उमेशचंद्र मोरे यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले.
देशभरातील विविध विधी सेवा प्राधिकरणांच्या कामांमध्ये निकोप स्पर्धा ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकराणाने राज्या- राज्यांमध्ये यावर्षी स्पर्धा आयोजित केली. महाराष्ट्रातील सर्वच विधी सेवा प्राधिकरणाच्या स्पर्धेतून कोल्हापूर विधी सेवा प्राधिकरणाची यावर्षी  निवड झाली असून भारताचे सरन्यायाधिश श्री.टी.एस.ठाकुर यांच्या हस्ते कोल्हापूर विधी सेवा प्राधिकरणाचा राष्ट्रीय सन्मान होणार असल्याचे श्री. मोरे यांनी सांगितले.              
            श्री. मोरे म्हणाले, १९८७ पासून देशात विधी सेवा प्राधिकरण कायद्याअंतर्गत जिल्हयाच्या ठिकाणी विधी सेवा प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. प्रमुख जिल्हा न्यायाधिश हे प्राधिकरणाचे अध्यक्ष असतात तर वरिष्ठ जिल्हा न्यायाधिश हे सचिव असतात. कोल्हापूर विधी सेवा प्राधिकरणाने समाजातील तळागाळातील व्यक्तीला मोफत विधी सल्ला देण्याचे काम प्रभावीपणे केले आहे. यावर्षी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाने कोल्हापूर जिल्हयासाठी तृतीयपंथी आणि वारांगणांपर्यत विधी सेवा पुरविण्याची व त्यांचा सहभाग मिळविण्याची जबाबदारी सोपविली होती. कोल्हापूर प्राधिकरणास याकामी  जिल्हा प्रशासन व न्याययंत्रणेचे मोलाचे मार्गदर्शन व मदत लाभली. शिक्षक, सामाजिक संस्था, विविध शाखांमध्ये शिक्षण घेतअसलेल्या विद्यार्थ्यांनी मोठया प्रमाणात सहभाग घेतला. परिणामी तृतीय पंथी व वारांगणांपर्यंत विधी सेवा प्रभावीपणे पोहचविता आल्या.
परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. उपसंपादक रितेश भुयार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले. 
                                                 0000000





No comments:

Post a Comment