Thursday, 22 December 2016

महाराष्ट्रातील चार अंगणवाडी सेविकांना राष्ट्रीय पुरस्कार














नवी दिल्ली 22 : महाराष्ट्रातील चार अंगणवाडी  सेविकांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील अंगणवाडीमध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल  आज केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री मेनका गांधी यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले.
        येथील अशोका हॉटेलमध्ये केंद्रीय महिला व बाल कल्याण विभागाच्यावतीने वर्ष 2014-15 व 2015-16 या वर्षासाठी अंगणवाडी सेविकांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री मेनका गांधी होत्या. यावेळी केंद्रीय महिला व बाल कल्याण राज्यमंत्री कृष्णा राज यांच्यासह वरिष्ठ अधिकारी मंचावर उपस्थित होते.  
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडळ येथील अंगणवाडी क्रमांक 85 च्या अंगणवाडी सेविका शैलजा वंळजू यांना वर्ष 2014-15 वर्षासाठी पुरस्कृत करण्यात आले. वर्ष 2015-16 साठी अमरावती जिल्ह्यातील वरूड येथील अंगणवाडी क्रमांक 34 च्या रत्नमाला शिवहरी ब्राम्हाने तसेच अंगणवाडी क्रमांक 92 च्या सुनीता नथीले आणि ठाणे जिल्ह्यातील सेहरी येथील अंगणवाडी क्रमांक 52 च्या  बबिता प्रभाकर भुजबळ यांना आज पुरस्कृत करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप 25 हजार रूपये रोख व प्रशस्ती पत्र असे आहे.
राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात कुपोषित बालकांसाठी, दारिद्रय रेषेखालील बालकांसाठी, गर्भवती महिलांसाठी, तसेच स्तनदा मातांसाठी विविध कौशल्य पुर्ण उपक्रम राबवून त्यांच्यात जागृकता निर्माण केली. त्यांना पोषण आहार प्रदान करून देशाच्या विकासात महत्वपुर्ण भुमिका निभावली.  
यासह या अंगणवाडी सेविकांनी स्वच्छता मोहीम, विटामिन ए च्या गोळयांचे वितरण करणे, अंगणवाडयांमध्ये स्वानंदी मिशन राबविणे, सामाजिक लेखा परीक्षा अंगणवाडीत घेणे, वीएचएनडी दिवस साजरा करणे, सुकन्या योजना, इंदिरा गांधी मातृत्व योजना, राजीव गांधी सबला योजना, किशोरी शक्ति योजनांची अंगणवाडयांच्या मध्यामातुन माहिती प्रदान करणे, अंगणवाडयांमध्ये जागतिक महिला दिन साजरा करणे, स्वास्थ्य सप्ताह साजरा करणे, सुरक्षित माता आणि शिशु दिवस साजरा करणे, सुरक्षित आहार दिवस साजरा करणे, विश्व हैंड वाश दिवस साजरा करणे, वृक्षारोपण, पल्स पोलियो विशेष अभियान, कुंटूब कल्याण नियोजन सांगणे असे अनेक उपक्रम अंगणवाडयातून राबविले आहेत.

No comments:

Post a Comment