Saturday 31 December 2016

‘महाजनको’ ला सर्वोत्तम ऊर्जा निर्मितीसाठी पुरस्कार





नवी दिल्ली, 31 : महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी (महाजनको)ला सर्वोत्तम ऊर्जा निर्मितीसाठी वज्रया विशेष पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
        एनरेशिया फाऊंडेशन या ऊर्जा क्षेत्रातील अभ्यास करणा-या आंतरराष्ट्रीय संस्थेच्यावतीने नुकतेच ‘10 व्या एनरेशिया 2016’ पुरस्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले. ऊर्जा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या भारतातील तसेच दक्षिण आशियातील शासकीय, निमशासकीय व अशासकीय संस्थांचा विविध पुरस्कार देऊन यावेळी गौरव करण्यात आला. केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा विभागाचे सचिव उपेंद्र त्रिपाठी यांच्या हस्तेमहाजनकोला वज्र या विशेष पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.  महाजनकोच्यावतीने दिल्ली स्थित महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे निवासी कार्यकारी संचालक प्रफुल्ल पाठक यांनी हा पुरस्कार स्वीकारला.  
ऊर्जा निर्मिती क्षमता स्थापीत करण्यात महाराष्ट्र अग्रगण्य
विविध क्षेत्रात अग्रेसर असणा-या महाराष्ट्र राज्याने ऊर्जा निर्मिती क्षमता स्थापीत करण्यातही देशात अग्रगण्य स्थान मिळवले आहे. राज्याने 39 गीगा वॅट ऊर्जा निर्मिती क्षमता स्थापीत करून देशात ऊर्जा निर्मिती क्षमता स्थापीत करण्यात आघाडी घेतली आहे. या ऊर्जेपैकी १० गीगा वॅट अर्थात २५ टक्के ऊर्जा निर्मिती ही निव्वळ नवीकरणीय ऊर्जेच्या माध्यमातून करण्यात येते. नवीकरणीय ऊर्जा निर्मिती  क्षेत्रातही देशात महाराष्ट्राने अव्वल स्थान मिळविले आहे. राज्याने पवन ऊर्जेच्या माध्यमातून ५.४ गीगा वॅट ऊर्जा निर्मिती क्षमता  स्थापीत केली आहे. त्यामुळे पवन ऊर्जा निर्मिती क्षमतेतही महाराष्ट्र देशात दुस-या क्रमांवर असल्याचे पुरस्कार निवड समितीने नोंदविले आहे.

 राज्य विद्युत मंडळाअंतर्गत कार्यरत महाजनकोची ऊर्जा निर्मिती क्षेत्रात महत्वाची भूमिका राहीली आहे. राज्यात अन्य ऊर्जा निर्मिती संस्थाच्या तुलनेत महाजनको ब-याच काळापासून उत्तम व कार्यक्षमपणे कार्य करणारी संस्था म्हणून ओळखली जाते. सद्या देशात ऊर्जा निर्मिती क्षेत्रात अग्रेसर असणा-या केंद्र शासनाच्या नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन(एनटीपीसी) नंतर राज्यांच्या श्रेणीत महाजनको या महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा निर्मिती संस्थेचा अव्वल क्रमांक लागतो. या कामगिरीसाठी महाजनकोला हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्रदान करण्यात आला.  

No comments:

Post a Comment