Friday, 9 December 2016

महाराष्ट्राच्या प्रादेशिक चित्रपट संग्रहालयास केंद्राचे तांत्रिक सहकार्य - अजय मित्तल



                            
नवी दिल्ली ९ : राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या धर्तीवर प्रस्तावित असलेल्या महाराष्ट्राच्या प्रादेशिक चित्रपट संग्रहालयास केंद्र शासन तांत्रिक सहकार्य करेल तसेच आर्थिक सहाय्याबाबत विचार करेल असे आश्वासन केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव अजय मित्तल यांनी आज दिले.
            केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्यावतीने विज्ञान भवनात २८ व्या राज्यांच्या माहिती मंत्र्यांच्या  परिषदेचे (SIMCON) आयोजन करण्यात आले आहे. या द्विदिवसीय परिषदेस आज सुरुवात झाली. परिषदेत केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी तसेच विविध राज्यांच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे सचिव, महासंचालक, संचालक बैठकीस उपस्थित होते. या परिषदेस महाराष्ट्राच्यावीतने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे उपसंचालक(माहिती)दयानंद कांबळे उपस्थित होते.
पहिल्या सत्रात भारताला चित्रपट नगरी म्हणून विकसीत करणे या विषयावर चर्चा झाली. चर्चेत भाग घेत श्री कांबळे यांनी मराठी चित्रपटांची समृध्द परंपरा विषद केली. 19 व्या शतकाच्या सुरूवातीपासून मराठी चित्रपटांची निर्मिती सुरू झाली. या चित्रपटांनी मनोरंजन तसेच सामाजिक क्षेत्रात महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे. मोलाचा ठेवा असणा-या मराठी चित्रपटांचे जतन होणे आवश्यक आहे. राष्ट्रीय चित्रपट संग्राहलयाच्या धर्तीवर मराठी चित्रपट संग्राहलय करून त्यामाध्यमातून चित्रपटांचे जतन करण्याचा राज्य शासनाचा मानस असून त्यासाठी केंद्र शासनाने तांत्रिक सहकार्य करावे अशी मागणी श्री कांबळे यांनी यावेळी केली.
या संदर्भातील उत्तरात सचिव श्री मित्तल यांनी केंद्र शासनाकडून मराठी चित्रपटांच्या जतनासाठी तांत्रिक सहाकार्य करण्यात येईल असे आश्वासन दिले. या कामी पुरेशे आर्थिक सहकार्य करण्यात येईल असेही श्री मित्तल यांनी सांगितले .
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कामाची राष्ट्रीय पातळीवर दखल
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनायाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाचे कौतुक या परिषदेत झाले. माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव अजय मित्तल यांनी महांसचालनालयाच्यावतीने आकाशवणीहून प्रसारीत करण्यात येणारा दिलखुलासकार्यक्रम आणि दूरदर्शनच्या सहयाद्री वाहिनीहून प्रसारीत होणारा जय महाराष्ट्र’  आणि लोकराज्य’ ‘महाराष्ट्र अहेड या मासिकांच्या माध्यमातून राज्य शासनाच्या  विविध योजनां व कार्यक्रमांची प्रभावीपणे देण्यात येणारी माहिती हे स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगितले. तसेच महासंचालनालयाच्या दिल्लीस्थित महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित करण्यात येणारी जनसंपर्क विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळा हा स्तुत्य उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले.    
                                     राष्ट्रीय चित्रपट संग्राहलयाचे आकर्षक प्रदर्शन

पुणे येथील राष्ट्रीय चित्रपट वारसा कार्यक्रमाचे विशेष कार्य अधिकारी संतोष अजमेरा यांच्या पुढाकाराने या परिषदेत भारतीय चित्रपट सृष्टीच्या समृध्द परंपरेचे कालखंडानुसार प्रदर्शन मांडण्यात आले आहे. स्वातंत्रय चळवळीच्या काळात चित्रपटांचे योगदान, समाज सुधारणेतील चित्रपटांचे योगदान दर्शविणारे आकर्षक प्रदर्शन मांडण्यात आले आहे. जीवनपट, ॲक्शनपट, विनोदी चित्रपट आदी विषय या प्रदर्शनात मांडण्यात आले आहे.  

No comments:

Post a Comment