नवी दिल्ली 22 : राज्यातील ग्रामीण तसेच शहरातील बालकांना संस्कारीत तसेच सदृढ करण्याची महत्वाची भुमिका निभावणा-या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चार अंगणवाडी सेविका यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली.
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैलजा वंळजू, अमरावती जिल्ह्यातील रत्नमाला शिवहरी ब्राम्हने तसेच सुनीता नथीले आणि ठाणे जिल्ह्यातील बबिता प्रभाकर भुजबळ यांना आज अशोका हॉटेलमध्ये केंद्रीय महिला व बाल कल्याण विभागाच्यावतीने वर्ष 2014-15 व 2015-16 या वर्षासाठी अंगणवाडी सेविकांना केंद्रीय माहिला व बाल कल्याण मंत्री मेनका गांधी यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमानंतर त्यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांचा छोटेखानी सत्कारचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी पुरस्कार प्राप्त अंगणवाडी सेविकांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी पुणे विभागाच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी अश्विनी कांबळे, संध्या नगरकर, अमरावती विभागाचे बाल विकास प्रकल्प अधिकारी राजीव पाटील, अमरावती विभागाच्या पर्यवेक्षिका सुजाता देशमुख पुरस्कार प्राप्त अंगणवाडी सेविकांचे कुटूंब सदस्य, कार्यालयातील अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आदिवासी भागातील कुपोषण दूर करण्यात ज्यांचा मोठा वाटा आहे त्या कुडळ येथील अंगणवाडी क्रमांक 85 च्या अंगणवाडी सेविका शैलजा वंळजू यांनी आपल्या अनुभव कथनात सांगितले, सुरूवातील विनामुल्य बालवाडी घरातच सुरू केली. त्यानंतर वर्ष 2000 मध्ये त्या अंगणवाडी सेविका म्हणून नियुक्त झालया. त्यांची अंगणवाडी क्षेत्र हे आदीवासी भागात मोडते तिथे सुरूवातीला कुपोषित बालकांचे प्रमाण मोठया प्रमाणात होते, मात्र शासनाच्या पोषक आहारामुळे तसेच त्यांच्या विशेष प्रयत्नांनी याभागातील कुपोषणाचे प्रमाण सध्या फार कमी झाले आहे. श्री शैलजा यांना वर्ष 2014-15 साठीचा उत्कृष्ट अंगणवाडी सेविकेचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
अमरावती जिल्ह्यातील वरूड येथील अंगणवाडी क्रमांक 34 च्या रत्नमाला शिवहरी ब्राम्हने या जीतक्या चांगल्या अंगणवाडी सेविका आहेत तेवढयाच त्या उत्तम कवीयत्रीही आहेत. त्या अंगणवाडीमधील बालकांना स्वरचित कवीतांच्या माध्यमातून मनोरंजक पद्धतीने बालकांना संस्कारीत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. श्रीमती रत्नमाला यांनी आधी आपल्या घरातच 1986 मध्ये बालवाडी सुरू केली होती. 1996 मध्ये त्या अंगणवाडी सेविका म्हणुन नियुक्त झाल्यात. त्या अंगणवाडीच्या माध्यातून आवश्यक असणारे राष्ट्रीय कार्यक्रम राबवितात. त्यांना विभागीय स्तरावर महिला दिनाचा पुरस्कारही प्राप्त झाला आहे.
अमरावती जिल्ह्यातील वरूड येथील सुनिता नथीले अंगणवाडी क्रमांक 92 च्या अंगणवाडी सेविका आहेत. यांच्या अंगणवाडी अंतर्गत येणारे गाव हे दोन हजार लोकसंख्येचे आहे. इथे त्या लोकसभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवितात. बालकांना कॉनवेंट सारखे बालशिक्षण अंगणवाडी प्रदान करू शकते हे त्यांनी त्यांच्या अंगणवाडीतून दाखवून दिले आहे. त्यांनी अंगणवाडी या शब्दाचा विग्रह करून सांगितला. अं-अंगणातबसून, ग-गगणभरारी घेण्याचे धडे, ण-लसीकरणाचा बाण चालविणे, वा-वाल्याचा वाल्मीकी करविणे, डी-डिवचणा-या रोंगापासून संरक्षण करणे, अशा पद्धतीने जागृकता निर्माण करण्याची महत्वपूर्ण भुमिका त्या निभावतात.
ठाणे जिल्ह्यातील सेहरी येथील अंगणवाडी क्रमांक 52 च्या बबिता प्रभाकर भुजबळ या 1991 पासून अंगणवाडी सेविका आहेत. ‘आकार’ या कार्यक्रमातंर्गत बालकांना घडविण्याचे कार्य त्या करतात त्या म्हणाल्या, ‘बालकांना संस्कारीत, कुपोषण मुक्त करण्याच्या क्षेत्रात मी कामकरित असल्यामुळे माझे जीवन हे ख-या अर्थाने सार्थक झाले आहे’.
देशाच्या राजधानी मराठमोळया पद्धतीने झालेल्या सत्काराने अंगणवाडी सेविका अभिभूत झाल्याचे मनोगत सर्वांनी व्यक्त केले. कार्यक्रमाची प्रस्तावना उपंसचालक दयानंद कांबळे यांनी केली, सुत्रसंचालन माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे यांनी केले.
No comments:
Post a Comment