नवी दिल्ली, दि. ५ : भारत स्काऊट गाईड चळवळीच्या माध्यमातून उल्लेखनीय समाज कार्य करणा-या महाराष्ट्रातील ७ व्यक्तींना राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते ‘राष्ट्रपती स्काऊट ॲण्ड गाईड पुरस्काराने’ सन्मानीत करण्यात आले.
राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉल मध्ये
आयोजित कार्यक्रमात विविध श्रेणींमध्ये आज वर्ष २०१५ चे ‘राष्ट्रपती स्काऊट ॲण्ड गाईड पुरस्कार’ प्रदान
करण्यात आले. महाराष्ट्रातील ७ व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. प्रशस्तीपत्र
असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट
गाईडच्या विविध पदांवर उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल शोभना जाधव यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. साडेतीन दशक
त्यांनी अविरत सेवा दिली. त्यांनी महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि
आंतरराष्ट्रीय पातळीवर स्काऊड गाईच्या माध्यमातून सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात
उल्लेखनीय कार्य केले. त्या सध्या भारत स्काऊट गाईडच्या राष्ट्रीय नियम समितीच्या
सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
महाराष्ट्र राज्य स्काऊट ॲण्ड गाईचे विधी सल्लागार ॲड अशुतोष कुंभकोनी यांना
पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्यातील विविध विधी महाविद्यालय, विविध बार
असोशिएशन आणि जनसामान्यांना कायद्याचे प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्यात ॲड कुंभकोनी
यांनी मोलाचे योगदान दिले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने बहुतेक वेळा गरजू
व्यक्तींसाठी वकील म्हणून त्यांची नेमणूक केली आहे.
जळगाव जिल्हा स्काऊड ॲण्ड गाईडचे सहायक आयुक्त अनंत
काळे यांनी जिल्हयात स्काऊट गाईड चळवळीच्या विस्तारात दिलेल्या महत्वाच्या योगदानासाठी त्यांना या
मानाच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. राज्य भारत स्काऊट गाईडमध्ये तीन दशक
सेवा देणारे श्री. काळे यांनी चळवळीसाठी निधी संकलनात मोलाचे योगदान दिले. युवा व ज्येष्ठांसाठी
जिल्हा स्तरीय संमेलन आयोजित करण्यात त्यांचा सक्रीय सहभाग राहीला आहे.
वाशिम जिल्हा स्काऊट गाईडच्या आयुक्त रजनी धानोरक
यांनी विविध आयोजनांच्या माध्यमातून स्काऊट गाईड चळवळीचा विस्तार केला. श्रीमती
धानोरकर यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना या मानाच्या पुरस्काराने सन्मानीत
करण्यात आले.अडीच दशकांच्या कार्यकाळात त्यांनी विविध प्रशिक्षण शिबीर आयोजित करून
स्काऊट गाईडच्या गुणात्मक वाढीसाठी मोलाचे योगदान दिले.
पुणे जिल्हा स्काऊट गाईडच्या सह सचिव
सरला भोसले यांना या पुरस्काराने सन्मानीत
करण्यात आले. गेल्या तीन दशकापासून चळवळीत सक्रीय असणा-या सरला भोसले या
व्यवसायाने शिक्षीका असून त्यांनी पुणे परिसरातील आर्थिकदृष्टया मागास समाजाच्या
विकासासाठी मोलाचे योगदान दिले.
महाराष्ट्र स्काऊट गाईडचे माजी
प्रशिक्षक अप्पासाहेब शिंदे यांना उल्लेखनीय सेवेसाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात
आला. राज्यातील विविध जिल्हयांमधे स्काऊट गाईडचा विस्तार करण्यासाठी त्यांनी
मोलाचे योगदान दिले.
राज्य स्काऊट गाईडच्या प्रशिक्षक
कुसुम लोंढे यांनी मुलींना प्रशिक्षीत करण्यासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी
त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आधुनिकतेची कास धरून स्काऊट
गाईडचा विस्तार करण्यात त्यांनी महत्वाची भूमीका निभवली आहे.
००००००
No comments:
Post a Comment