Thursday 26 January 2017

राजधानीत 68 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा : राजपथावर महाराष्ट्राच्या चित्ररथाचे शानदार प्रदर्शन












नवी दिल्ली, 26 : देशाचे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अबु धाबीचे क्राऊन युवराज तथा संयुक्त अरब अमीरातच्या सशस्त्र दलाचे उप सर्वोच्च कमांडर शेख मुहम्मद बिन जायद अल नाहयान  यांच्या उपस्थितीत आज राजपथावर पार पडलेल्या 68 व्या प्रजासत्ताक दिन सोहळयात महाराष्ट्राच्या चित्ररथाचे शानदार प्रदर्शन बघायला मिळाले.

राजपथावर देशाच्या समृध्द सांस्कृतिक वारसा व शस्त्रसज्जते सोबतच 17 राज्यांचे चित्ररथ तसेच 6 केंदीय मंत्रालयाच्या योजनांवर आधारीत चित्ररथाने लक्ष वेधले. राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार प्राप्त पथ संचलनामध्ये महाराष्ट्राची नीशा पाटीलचा सहभागाने ऊर अभिमानाने दाटून आला. यासह एनसीसी आणि एनएसएसच्या पथकांमध्येही महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी राजपथावर सहभाग नोंदवून महाराष्ट्राची पंरपरा कायम ठेवली.
  
        प्रजासत्ताक दिनाच्या सकाळी देशाच्या राजधानीत पसरलेले धुके, जोडीला असलेली कडाक्याची थंडी यास न जुमानता दिल्लीकर व देश-विदेशातून राजपथावर अलोट जनसमुदाय जमला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राजपथावर आगमन झाले. देशासाठी शहीद झालेल्या वीर सैनिकांच्या स्मरनार्थ सदैव तेवत राहणा-या इंडियागेटस्थितअमर जवान ज्योतीला पंतप्रधानांनी देशवासीयांच्यावतीने आदरांजली वाहिली. यावर्षीच्या प्रजासत्ताकदिनाचे विशेष पाहुणे अबु धाबीचे क्राऊन युवराज तथा संयुक्त अरब अमीरातच्या सशस्त्र दलाचे उप सर्वोच्च कमांडर शेख मुहम्मद बिन जायद अल नाहयान  आणि राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे राजपथावर आगमन झाले. उपराष्ट्रपती हामीद अन्सारी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री व विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ध्वजारोहण केले यानंतर, राष्ट्रगीत व त्यासोबतच 21 तोफांची सलामी देण्यात आली. असम रेजीमेंटच्या 35 व्या तुकडीचे  हवीलदार हंगपन दादा (13622536एन) यांना त्यांच्या अभुतपूर्व शौर्य व बलीदानासाठी मरणोत्तर सर्वोच्च शौर्य पदक अशोक चक्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या पत्नी श्रीमती चेसन लोवांग दादा यांनी हा सन्मान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते स्वीकारला.
विविध सैन्य दलाचे पथक

            यावर्षी संयुक्त अरब अमिरात यांचे सैन्य दलाच्या पथकाने पथसंचलनात भाग घेतला. भारताची शस्त्र सज्जता दर्शविणा-या सेनेच्या तीनही दलांचे पथक, आकर्षक चित्ररथ , सेनेच्या सैनिकांचे आणि बॅड पथकांचे पथसंचलन, सिमा सुरक्षा दलाचे घोडदल, उंटदल यांचे पथसंचलन आणि बायकर्सच्या चित्तथरारक कसरती तसेच असमानी करतबीने  उपस्थितांच्या टाळया मिळवत होते.

              वैशिष्टयपूर्ण व वैविध्यपूर्ण संस्कृती दर्शविणा-या एकूण 17 राज्यांचे आणि 6 केंद्रांतील मंत्रालयांनी तयार केलेल्या आकर्षक चित्ररथांच्या पथसंचलनाने उपस्थितांचा उत्साह व्दिगुणीत केला.
           
असामान्य शौर्य दाखविणा-या देशभरातील राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार प्राप्त 25 मुला-मुलींनी यावेळी उघडया जिप्सीमधून उपस्थितांना अभिवादन केले. जळगावची नीशा पाटील हीचा यामध्ये समावेश होता. 

राजपथावर लोकमान्य टिळक यांच्यावर आधारीत चित्ररथ

महाराष्ट्राच्यावतीने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे व्यक्तीमत्व दर्शविणारा चित्ररथ राजपथावर प्रदर्शित झाला आणि पुन्हा एकदा टिळक युग जीवंत झाल्यासारखे जाणवले. राजपथाच्या सलामी मंचापुढून जात असतांना महाराष्ट्रासह देशातील अनेक नेत्यांनी उभे राहून या चित्ररथाला मानवंदना दिली.
 लोकमान्य टिळकांच्या 160 व्या जयंती निमित्त या चित्ररथाच्या माध्यमातून देशवासियांना  टिळकांचे बहुआयामी व्यक्तीमत्व आणि स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचे योगदान दर्शविण्यात आले. भारत देश पारतंत्र्यात असताना लोकमान्य टिळकांनी मराठाकेसरीवृत्तपत्रातून केलेली सामाजिक जागृकता आणि ब्रिटीशांना दिलेले सडेतोड उत्तर, छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि गणेशोत्सव सुरु करून भारतीयांना संघटीत करण्याचे केलेले कार्य, टिळकांवर चालविण्यात आलेले खटले, शिक्षण, शारीरिक शिक्षणाला दिलेले प्रोत्साहन आदीं बाबींना या चित्ररथाच्या माध्यमातून दर्शविण्यात आले.
चित्ररथाच्या प्रारंभी लोकमान्य टिळकांचा 15 फुट उंचीचा पुतळा होता. ते अग्रलेख लिहीताना दर्शविण्यात आले. पुतळयाच्या मागे एक प्रिंटीग प्रेस दर्शविण्यात आली. त्यातून छपाई होणारे केसरीमराठा वृत्तपत्र दर्शविण्यात आले. चित्ररथाच्या मध्यभागी फिरते मंदिर दर्शविण्यात आले असून छत्रपती शिवाजी महाराज आणि गणपती  मुर्तीची स्थापना करतानाचे दृष्य होते. चित्ररथाच्या उजव्या आणि डाव्या बाजुला बंगालच्या फाळणीनंतर टिळकांवर चालविण्यात आलेला मुंबई उच्च न्यायालयातील खटला आणि मंडाले येथील तुरुंगवास दर्शविण्यात आला. चित्ररथाच्या शेवटच्या भागात मल्लखांब आणि कुस्तीकरणारे मुले  प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करताना दिसले. टिळकांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान अधोरेखित करण्यासाठी बाकावर बसलेला शाळकरी विद्यार्थ्यांची प्रतिकृती ठेवण्यात  आली. 

       स्वराज्य हा माझा जन्म सिध्द हक्क आहे आणि तो मी मिळविणारच ही  टिळकांची उदघोषणा चित्ररथा सोबत ऐकायला मिळली.  टिळक युग पुन्हा एकदा नजरे समोरून गेले. या चित्ररथाच्या  दोन्ही बाजुला पयल नमन हो करितो वंदन, तुम्ही ऐका हो गुणीजन , मी करितो कथन.. या गितावर नृत्य करणारे कलाकार हेाते.

राजपथावरील पथसंचलनात महाराष्ट्रातील २३ एनसीसी कॅडेटस सहभागी

मानाचे समजण्यात येणा-या राजपथावरील पथसंचलनात देशभरातील १४४ एनसीसी कॅडेटस सहभागी झालेत. त्यामध्ये महाराष्ट्राच्या २३ कॅडेट्सने सहभाग नोंदविला.
 

महाराष्ट्राचे  14  एनएसएस स्वयंसेवक पथसंचलनात सहभागी
         
राजपथावरील पथ संचलनात महाराष्ट्रातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) 14 आणि गोव्यातील 2 अशा  एकूण 16 विद्यार्थी- विद्यार्थीनीं सहभाग नोंदविला. यामध्ये पश्चिम विभागात समावेश असणा-या महाराष्ट्रातून 7 विद्यार्थी आणि 7 विद्यार्थीनी तर गोव्यातून प्रत्येकी 1 विद्यार्थी आणि 1  विद्यार्थीनी असे एकूण 16 स्वयंसेवकांनी आज राजपथावरील पथ संचलनात सहभाग घेतला.


No comments:

Post a Comment