Wednesday, 11 January 2017

आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यात मराठी पुस्तकांना उत्तम प्रतिसाद









नवी दिल्ली दि. 11 : मराठी भाषेतील गाजलेल्या कांदब-या, कथा संग्रह, कविता संग्रह, चरित्र,आत्मचरित्र, कोष वांड:मय आदिंना प्रगती मैदान येथे सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
        केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाअंतर्गत कार्यरत राष्ट्रीय पुस्तक न्यासच्यावतीने आयोजित आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यात देश-विदेशातील लेखकांची दर्जेदार पुस्तके विक्री व प्रदर्शनासाठी लावण्यात आली आहेत. या पुस्तक मेळाव्यात हॉल क्रं. १२-ए मध्ये स्टॉल क्रं.१५९ हा अखिल भारतीय मराठी प्रकाश संघाचा स्टॉल लावण्यात आला आहे. या स्टॉलवर मराठी पुस्तक खरेदी करणा-यांची गर्दी बघायला मिळते.
            या ठिकाणी जवळपास ८० प्रकाशकांची १,००० पुस्तके मांडण्यात आली आहेत. ना.स. इनामदार लिखित राऊ सह  मृत्युंजय, छावा,युगंधर आणि स्वामी या ऐतिहासिक कांदब-यांना चोखंदळ वाचक-ग्राहकांची मागणी आहे. स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांचीही इथे गर्दी दिसते. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीराव पेशवे यांच्या शासनकाळातील प्रशासन, अर्थनिती आदी विषयांचा समावेश असलेले कालातीत व्यवस्थापन तत्वे, ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे आत्मचरित्र लोक माझे सांगांतीआणि साऊथ ब्लॉक दिल्ली ही पुस्तके स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांचे विशेष आकर्षण ठरले असल्याचे पुस्तक विक्रेते सुकुमार बेरी सांगतात.
            बेट्टी महमुदी यांचे नॉट विदाउट माय डॉटर’, कन्नड मधील प्रसिध्द लेखक एस. भैरप्पा यांचे पर्व आणि प्रसिध्द संगीतकार एस.डी.बर्मन यांचे चरित्र सुन मेरे बंधुरेही मराठीत भाषांतरीत पुस्तकेही इथे आहेत. शिवाय हिंदी से मराठी’,‘मराठी से हिंदी’, ‘हिंदी -मराठी मराठी- हिंदीआणि मराठी –इंग्रजी , इंग्रजी –मराठी शब्दकोष , व्युत्पत्ती कोष, सुभाषीत कोष या ठिकाणी बघायला मिळतात.
            प्रसिध्द लेखिका सुधा मुर्ती यांचे विविध कथा संग्रह इथे आहेत, नामवंत कवींचे  काव्य संग्रह, नाटय संग्रह, आत्मचरित्र, चरित्र आदी इथे उपलब्ध असून पुस्तक मेळाव्यास भेट देणा-या वाचक-ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद या स्टॉल ला मिळत आहे. दिल्लीत विविध क्षेत्रात कार्यरत मराठी भा‍षिकांनीही या स्टॉलला भेट दयावी असे आवाहन अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाच्या वतीने करण्यात आले आहे. दिनांक १५ जानेवारी २०१७ पर्यंत सकाळी ११ ते रात्री ८  या कालावधित पुस्तक मेळाव्यास भेट देता येणार आहे.
    
0000000

            

No comments:

Post a Comment