नवी
दिल्ली, दि.17 : जळगाव
जिल्हयातील भडगाव येथील निशा पाटील हीला यंदाचा(वर्ष २०१६) राष्ट्रीय बाल शोर्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
राष्ट्रीय बाल शोर्य पुरस्काराची आज घोषणा करण्यात
आली. देशातील २५ बालकांना शौर्य पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे, यामध्ये
महाराष्ट्रातील निशा पाटीलचा समावेश आहे. भारतीय बालकल्याण परिषदेच्या अध्यक्ष
गीता सिध्दार्थ यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांच्या हस्ते २३ जानेवारी रोजी या शुर बालकांना गौरविण्यात येणार आहे.
जळगाव जिल्हयातील भडगाव
येथील निशा पाटीलने ६ महीन्याच्या चिमुरडीला आगीच्या विळख्यातून सुखरूपपणे बाहेर
काढत दाखविलेल्या साहसाची नोंद घेत तिला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर
करण्यात आला आहे. १४ जानेवारी २०१५ ला सकाळी १० वाजताच्या सुमारास निशा पाटील
आपल्या मैत्रिणीकडे आली असता शेजारच्या घरातून धूर निघत असल्याचे तिने पाहीले. समोर
घराला आग लागली आणि घरात लहानगी मुलगी असल्याचे कळताच निशाने त्या चिमुरडीचा जीव
वाचविण्यासाठी घरात उडी घेतली. घराच्या छताला आग लागलेली, पडदयांनीही पेट घेतली
आणि ज्या पाळण्यात लहानगी झोपली होती तो पाळणाही जळून तुटला होता. पाळण्यातली
लहानगी पूर्वी देशमुख जिवाच्या आकांताने रडत होती हे चित्र पाहून स्वत:च्या जिवाची
पर्वा न करता निशाने लहानग्या पूर्वीला आगीतून बाहेर काढत तिचे प्राण वाचवले. मोठया
मुलाला शाळेत पोहचविण्यासाठी गेलेली पूर्वीची आई, कौशल्या देशमुख परत आली तेव्हा
घराला लागलेली आग आणि त्यातून सुखरूप बाहेर दिसलेली आपली लहानगी पाहून तिने निशाचे
कोटी कोटी आभार मानले.
निशाच्या या
साहसी कार्यामुळे पंचक्रोशीत तिचे कौतुक होत आहे. तिच्या साहसाची नोंद घेत देशातील
सर्वोच्च बाल शौर्य पुरस्कारासाने तिचा पंतप्रधानांच्या हस्ते तिचा सन्मान होणार
आहे. २६ जानेवारी ला राजपथावर होणा-या पथसंचलनातही ती सहभागी होणार आहे. सध्या निशा
ही भडगाव येथील आदर्श कन्या कनिष्ठ महाविद्यालयात १२ वीत शिकत आहे. ८ व्या वर्गात
हिंदीच्या पुस्तकात ‘साहसी बालक’ या
धडयातून तिला साहसीकृत्याची प्रेरणा मिळाल्याचे ती सांगते.
१२ मुली आणि १३ मुलं अशा एकूण २५ बालकांना वर्ष २०१६ च्या राष्ट्रीय बाल शौर्य
पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. यामध्ये ४ बालकांना मरणोत्तर हा पुरस्कार
जाहीर झाला आहे. पदक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार
प्राप्त बालकांना भारतीय बालकल्याण परिषदेच्यावतीने शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत
आर्थिक मदत करण्यात येते. तसेच, वैद्यकशास्त्र आणि अभियांत्रीकीचा अभ्यास करणा-या
विद्यार्थ्यांना इंदिरा गांधी शिष्यवृत्तीअंतर्गत पदवी पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत
पुरविण्यात येते
00000
सूचना सोबत छायाचित्रे आहेत.
No comments:
Post a Comment