नवी दिल्ली 17 : थल सेना, जल सेना आणि वायु सेनामधील विविध क्षेत्रात मुलींना उत्तम संधी आहेत, त्या संधीचा योग्य वापर भविष्य घडविण्यासाठी मुलींनी करावा, असे आवाहन मेजर जनरल डॉ. माधुरी कानिटकर (विशिष्ट सेवा मेडल) यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र परिचय केंद्रास मेजर जनरल डॉ. कानिटकर यांनी आज भेट दिली. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी मेजर जनरल डॉ. कानिटकर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. देशातील एकमेव सैन्य सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालय (Armed force medical collage),पुणे येथे आहे. त्यांची या महाविद्यायात अधिष्ठता या पदावर नियुक्ती झाली आहे.. देशातील तीन मेजर जनरल महिलांपैकी त्या एक आहेत. परिचय केंद्राच्यावतीने त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी माहिती अधिकारी अंजू निमसरकर कांबळे, कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
मुली आज नवनवीन क्षेत्रात आपले मोलाचे योगदान देत आहे. थल सेना, जल सेना, वायु सेनामध्येही अनेक महत्वाच्या पदाची धूरा मुली सांभाळत आहेत. येथे अनेक क्षेत्रात आजही मुलींना मोठया प्रमाणात संधी उपलब्ध आहे. त्याचा लाभ मुलींनी उचलावा असे मे. जनरल डॉ. कानिटकर म्हणाल्या.
सैन्यात काम करताना कामाचे समाधान मिळते, असे सांगुन त्या म्हणाल्या, सैन्यामध्ये वैद्यकीय सेवेत काम करत असताना सुरूवातीला या क्षेत्राचे ज्ञान घेण्यासाठी प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात तीन वर्षाचे विशेष प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे सैन्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रात नैतिकता प्राथमिकतेने जपली जाते.
सैनिक, शिक्षक आणि डॉक्टर या तिन्ही सेवा उच्चतम सेवा मानल्या जातात. सैन्यामधील वैद्यकीय सेवा ही या तिन्हींचा संगम आहे, त्यामुळे आधिकाधिक युवा वर्गाने याकडे कॅरीयर म्हणून बघावे, असेही त्या म्हणाल्या.
सुरूवातीला सैनिकांची मुले सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयात येत होती. आता समाजातील सर्वच स्तरातील विद्यार्थी या महाविद्यालयात प्रवेश घेत असल्याचा आनंद होतो. येथे मिळत असलेले शिक्षण हे सर्वोत्तम दर्जाचे आहे.
महिला सैन्य अधिकारी म्हणून विविध पदे सांभाळतांना देशातील अनेक ठिकाणी जावे लागले, तिथे त्यांना आलेले अनुभव त्यांनी यावेळी सांगितले.
मेजर जनरल कानिटकर यांनी सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालय (Armed force medical collage), पुणे महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. तसेच त्या इथे प्राध्यापकही होत्या. त्याच महाविद्यालयात सर्वोच्च पदावर रूजू होण्याचा विशेष आनंद होत असल्याच्या, भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
याप्रसंगी परिचय केंद्राचे उपसंचालक श्री.कांबळे यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने दिल्ली येथे राबविण्यात येणारे उपक्रम,प्रकाशित करण्यात येणारे विविध प्रकाशने आणि प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वयाविषयी मेजर जनरल डॉ. माधूरी कानिटकर यांना माहिती दिली. मेजर जनरल डॉ. कानिटकर यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कामाबद्दल कौतुक व्यक्त केले.
No comments:
Post a Comment