नवी
दिल्ली, ३१ : केंद्र
शासनाच्या मुद्रा, स्टँड अप इंडिया, स्टार्ट अप इंडिया, इज ऑफ डूईंग बिजनेस या
कार्यक्रमांमुळे देशातील सर्वस्तरातील उद्योजकांना मोठया प्रमाणात फायदा झाला. यामुळे
देशाच्या उद्योग क्षेत्रात सकारात्मक बदल झाला असून वर्ष २०१९-२० पर्यंत भारताचा
विकास दर १० टक्क्यांपर्यंत पोहचणार, असा विश्वास दलित
इंडीयन चेंबर ऑफ कॉमर्सचे (डिक्की) संस्थापक
तथा प्रसिध्द उद्योजक पद्मश्री
मिलींद कांबळे यांनी आज येथे
व्यक्त केला.
श्री.
मिलींद कांबळे यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक श्री. दयानंद
कांबळे यांनी श्री. मिलींद कांबळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. परिचय
केंद्राच्या माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे, उपसंपादक रितेश भुयार यांच्यासह
कार्यालयातील कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
श्री.
मिलींद कांबळे म्हणाले, केंद्र शासनाच्या ‘मुद्रा’ योजने अंतर्गत एका वर्षात देशातील ३.५ कोटी छोटया
उद्योजकांना आर्थिक मदत करण्यात आली आहे. याचा फायदा मुख्यत्वे अगदी छोटया स्तरावर
व्यवसाय करणा-या उद्योजकांना झाला. या योजनेच्या माध्यमातून उद्योजकांना ५० हजार
ते १० लाखांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले. ‘स्टँडअप इंडिया’ योजनेच्या माध्यमातून देशातील सार्वजनिक क्षेत्रातील २७ बँकांच्या जवळपास १
लाख २५ हजार शाखांनी (प्रत्येक शाखा)अनुसूचित जाती-जमातीच्या एका नवोदित उद्योजकाला व सामान्य
वर्गातील एका नवोदित महिला उद्योजिकेला अर्थ सहाय्य करून देशाच्या आर्थिक
व्यवस्थेत मोलाचे परिवर्तन घडवून आणले आहे. ‘इज ऑफ डुईंग’च्या माध्यमातून अनेक नवोदित उद्योजकांना नवे दालन
उपलब्ध झाले असल्याचेही श्री. मिलींद कांबळे म्हणाले. केंद्र शासनाने देशाची
आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी असे अनेक महत्वाचे पाऊले उचलली असल्याने वर्ष २०१९-२० पर्यंत
देशाचा विकास दर १० टक्क्यांपर्यंत पोहचणार असा विश्वास श्री. मिलींद कांबळे यांनी
व्यक्त केला.
डिक्कीच्या
माध्यमातून देशभरात उभे राहिलेले अनुसूचित जाती –जमातीच्या उद्योजकांचे जाळे व या
मंचाच्या माध्यमातून झालेले सकारात्मक बदल आदींबाबत श्री. मिलींद कांबळे यांनी
माहिती दिली. केंद्र व देशातील विविध राज्य शासनाच्या उद्योग विषयक धोरणात
अनुसूचित जाती –जमातीच्या उद्योजकांच्या अधिकारांसाठी डिक्कीने दिलेले योगदान याबाबतही
त्यांनी यावेळी उदाहरणासहीत माहिती दिली.
महाराष्ट्र
परिचय केंद्राच्यावतीने दिल्लीत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, प्रकाशीत करण्यात
येणारे विविध प्रकाशने आणि प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय आदींची
माहिती श्री. दयानंद कांबळे यांनी श्री. मिलींद कांबळे यांना दिली. श्री. मिलींद
कांबळे यांना यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राची प्रकाशने भेट स्वरूपात देण्यात
आली. परिचय केंद्राचे ग्रंथालय तसेच कार्यालयाच्या विविध विभागांना भेट देऊन श्री. मिलींद कांबळे यांनी माहिती
जाणून घेतली. श्री. मिलींद कांबळे यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कामाबद्दल
समाधान व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment