नारी शक्ती
राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त महिलांचा परिचय केंद्रात सन्मान
नवी
दिल्ली, ९ : कामाप्रती निष्ठा आणि
जनकल्याणाची भावना या सुत्राने उत्तम कार्य करू शकते, पुढेही असेच कार्य करीत
राहीन अशा भावना आशिया खंडातील पहिल्या महिला रेल्वे चालक मुमताज काजी यांनी आज
महाराष्ट्र परिचय केंद्रात व्यक्त केल्या.
उल्लेखनीय योगदानासाठी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी
यांच्या हस्ते ‘नारी शक्ती’ राष्ट्रीय
पुरस्कार प्राप्त मुंबई येथील मुमताज काजी यांचा आज महाराष्ट्र परिचय केंद्रात सत्कार
करण्यात आला. यावेळी झालेल्या चर्चेत त्या बोलत होत्या. महाराष्ट्र परिचय
केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी मुमताज काजी यांचा शाल,श्रीफळ व
पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
मुंबईतील
जोगेश्वरी भागात राहणा-या मुमताज काजी यांच्या कानावर बालवयात सतत पडणारा उपनगरीय
रेल्वेचा आवाज आणि रेल्वेत काम करणा-या
आजोबांकडून मिळालेली प्रेरणा या बाबी रेल्वे चालक बनण्यासाठी पुरक ठरल्या. वयाच्या
१८ व्या वर्षीच उत्तम गुणांनी रेल्वेची परिक्षा उत्तीर्ण करून स्वप्नपूर्तीच्या
दिशेने मुहर्तमेळ रोवल्याचे त्यांनी सांगितले. कुर्ला, भुसावळ येथे झालेले
प्रशिक्षण आणि १९९१ मध्ये रेल्वेत प्रवेश असे विविध टप्पे त्यांनी यावेळी विषद
केले. २००५ मध्ये बेलापूर, वाशी, पनवेल ,ठाणे या महत्वाच्या मार्गांवर रेल्वे चालक
म्हणून केलेली सुरूवात आणि या कार्यात सहकारी, अधिकारी व मुंबईकरांची मिळालेली साथ
यामुळेच आशियाखंडातील पहिली महिला रेल्वे चालक होण्याचा मान मिळाल्याच्या भावना मुमताज
काजी यांनी व्यक्त केल्या. कामाच्या
ठिकाणी उत्तम वातावरण उपलब्ध आहे, सर्व सहकारी आणि अधिकारी मदत करतात, यामुळेच मुंबईतील
चाकरमान्यांना रेल्वेच्या माध्यमातून वेळेत पोहचविण्याची जबाबदारी सक्षमपणे पार
पाडू शकते असे त्या म्हणाल्या. आपल्या कार्यामुळे महिलांना प्रेरणा मिळत असल्याचा
अत्यानंद होत असून यापुढे जोमाने कार्य करणार असल्याचे त्या सांगतात.
मुमताज काजी यांनी वयाच्या २० व्या वर्षा पासूनच डिजल
लोकोमोटिव रेल्वे चालविण्यास सुरुवात केली. त्यांच्या या साहसी कामाची दखल घेत
राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना जागतिक महिलादिनी ‘नारी शक्ती’ पुरस्काराने गौरविण्यात आले. बहु प्रतिष्ठीत लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने
१९९५ मध्ये मुमताज काजी यांना पहिली डीजल लोकोमोटिव ड्रायव्हर म्हणून समाविष्ट
केले आहे.
मुमताज काजी
यांच्या प्रकट मुलाखतीचे फेसबुक व ट्वीटरवर लाईव्ह प्रक्षेपण
दैनिक सामनाचे दिल्ली ब्युरोचिफ निलेशकुमार कुलकर्णी
यांनी यावेळी मुमताज काजी यांची प्रकट मुलाखत घेतली. प्रतिष्ठीत ‘नारी शक्ती पुरस्कार’ प्राप्त मुमताज काजी यांच्या
कार्याचा विविधांगी वेध घेणा-या या प्रकट मुलाखतीचे कार्यालयाच्या अधिकृत फेसबुक
आणि ट्वीटर अकाऊंटहून थेट लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले.दर्शक या प्रकट मुलाखती
आमच्या http://www.youtube.com/micnewdelhi या युटयुब
अकाऊंटवरही बघू शकतात.
0000
No comments:
Post a Comment